विवाहित महिलेच्या संबंधांचा संशय अन् २९ वर्षीय तरुणाचा रक्तरंजित शेवट! पालखी महामार्गावर दगडाने ठेचून हत्या; इंदापूरमध्ये दोघांवर गुन्हा


इंदापूर : अनैतिक संबंधांच्या संशयाने पेटलेल्या वादाचा शेवट थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडली आहे. एका विवाहित महिलेच्या संबंधांवरून निर्माण झालेल्या संशयातून २९ वर्षीय तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत दगडाने ठेचून ठार केल्याचा आरोप आहे. निमगाव केतकी येथील पालखी महामार्गावर गुरुवारी (२९ ऑक्टोबर) दुपारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पुष्पराज मुरलीधर गायकवाड (वय २९, रा. सणसर, ता. इंदापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास निमगाव केतकी येथील केतकेश्वर विद्यालयाजवळ पालखी महामार्गावर त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पराज याचे निमगाव केतकी येथील तलाठी भाऊसाहेब बारवकर यांच्या पत्नी तेजस्विनी बारवकर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणावरून स्वप्नील भीमराव बारवकर आणि अशुतोष संजय भोंग (दोघेही रा. निमगाव केतकी) यांनी पुष्पराजला लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणी मृत पुष्पराजची आई सुलोचना मुरलीधर गायकवाड (वय ४७, रा. सणसर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे पुढील तपास करत आहेत. तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे यांनी पूर्ण केली आहे.

अनैतिक संबंधांच्या संशयातून घडलेल्या या हत्येमुळे सणसर आणि निमगाव केतकी परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणातील नेमक्या घटनाक्रमाचा आणि हत्येमागील कारणांचा पुढील तपासातून उलगडा होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!