तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! एमपीएससीच्या ‘या’ ९ परीक्षांची चौकशी होणार, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटणे आणि उत्तरतालिकांबाबत झालेल्या कथित गैरप्रकारांची आता सखोल चौकशी केली जाणार आहे. यासाठी विशेष चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली असून, संबंधित प्रकरणांबाबत विद्यार्थ्यांसह परीक्षार्थी आणि विविध संस्थांकडून तक्रारी व निवेदने मागवण्यात आली आहेत.

संबंधित व्यक्ती, विद्यार्थी, परीक्षार्थी तसेच संस्थांनी आपली तक्रार आणि निवेदन १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रतिज्ञापत्रासह सादर करावे, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची सत्यता तपासणे, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करणे हा या चौकशीमागील मुख्य उद्देश आहे.

एमपीएससीच्या कोणत्या ९ परीक्षांची होणार चौकशी?
आयोगाकडून एकूण नऊ महत्त्वाच्या परीक्षांशी संबंधित प्रकरणांची चौकशी केली जाणार आहे. त्यामध्ये पुढील परीक्षांचा समावेश आहे.
औषध निरीक्षक परीक्षा गट-ब, २०२५
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा, २०२५
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, २०२५
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४
अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा, २०२३
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५
तक्रार आणि निवेदन कसे सादर करायचे?
या प्रकरणांमध्ये आपले म्हणणे मांडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा संबंधित व्यक्तींनी मराठी अथवा इंग्रजी भाषेत निवेदन तयार करणे आवश्यक आहे. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडाव्या लागणार आहेत. तसेच निवेदन प्रतिज्ञापत्रासह आयोगाकडे सादर करणे आवश्यक आहे.
निवेदन पाठवण्याचा पत्ता :
अन्न व औषध प्रशासन भवन, दालन क्रमांक २०१, दुसरा मजला, बीकेसी, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१.
ई-मेल : complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in
निवेदनाची एक प्रत दिलेल्या ई-मेल पत्त्यावरही पाठवणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांची माहिती गोपनीय ठेवणार
चौकशी आयोगाकडे प्राप्त होणारी सर्व निवेदने, प्रतिज्ञापत्रे आणि त्यासोबत जोडलेली कागदपत्रे गोपनीय ठेवण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारींची आणि कागदपत्रांची सखोल छाननी केल्यानंतर संबंधित व्यक्तींना साक्षीदार म्हणून आयोगासमोर बोलावण्याचा अधिकार आयोगाकडे असेल.
एमपीएससीच्या विविध परीक्षांशी संबंधित कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे या चौकशीतून मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता या चौकशी आयोगाच्या पुढील कार्यवाहीकडे राज्यातील स्पर्धा परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.
