लोणी काळभोरमध्ये मटका जुगार चालवणाऱ्या दोघांना दणका; पुणे पोलिसांकडून दोन वर्षांसाठी हद्दपार..


लोणी काळभोर : लोणी काळभोर परिसरात बेकायदेशीर मटका जुगाराचा व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दोन सराईत आरोपींना पुणे शहर पोलिसांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ‌प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन संतोष शुक्ला (वय ३०, रा. आग्रेवस्ती, लोणी काळभोर) आणि सागर भगवान ऊफाडे (वय ३१, रा. पाषाणकर बागेजवळ, लोणी काळभोर) अशी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील बेकायदेशीर धंदे करणारे, मटका जुगार चालविणारे, अंमली पदार्थांची विक्री करणारे तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहन शुक्ला आणि सागर ऊफाडे हे दोघेही पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही कथितरीत्या बेकायदेशीर मटका जुगाराचा व्यवसाय सुरू ठेवत होते. त्यांच्या कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दोघांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपआयुक्त परिमंडळ सहा यांच्याकडे पाठविला. या प्रस्तावाच्या आधारे पोलीस उपआयुक्तांनी दोघांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. ही कारवाई पोलीस उपआयुक्त जीवन बेनीवाल आणि सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, पोलीस हवालदार विलास शिंदे, महिला पोलीस हवालदार स्वाती पिसाळ, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे आणि प्रवीण दडस यांनी कारवाईत सहभाग घेतला.
परिसरातील बेकायदेशीर धंदे आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!