दिवाळीत खासगी बसचालकांची मनमानी महागात पडणार? पुणे आरटीओचा मोठा निर्णय; जादा भाडे घेतल्यास थेट व्हॉट्सॲपवर करा तक्रार!

पुणे : दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत खासगी बसचालकांकडून प्रवाशांकडे अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पुण्याहून नागपूरला जाण्यासाठी काही प्रवाशांना साडेचार ते पाच हजार रुपये मोजावे लागत असल्याची माहिती आहे. नेहमी दीड ते दोन हजार रुपयांत मिळणाऱ्या तिकिटांचे दर दुप्पट ते तिप्पट झाल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. पुणे–लातूर आणि पुणे–धाराशिव मार्गांवरही ८०० ते एक हजार रुपयांचे तिकीट दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) प्रवाशांसाठी तक्रारीची विशेष सुविधा उपलब्ध केली आहे.

आता एका संदेशात नोंदवा तक्रार
खासगी बसचालकांकडून जादा भाडे आकारले जात असल्यास प्रवाशांना ८२७५३३०२०९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार करताना तिकिटाचा फोटो आणि प्रवासासंबंधी आवश्यक माहिती पाठवावी लागेल. प्राप्त तक्रारींची चौकशी करण्यात येणार असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात जादा पैसे आकारणाऱ्या बसचालकांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.


बसचालकांना आधीच दिली ताकीद
आरटीओ अधिकाऱ्यांनी खासगी बसचालकांची बैठक घेऊन नियमांनुसार भाडे आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रवाशांची आर्थिक फसवणूक करू नये आणि ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अशी सक्त ताकीदही देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात तुलनात्मक समान मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या बसभाड्यापेक्षा खासगी बसचे भाडे जास्तीत जास्त ५० टक्क्यांपर्यंत वाढवता येते, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्यास प्रवाशांना तक्रार करता येईल.
रेल्वे आरक्षण संपल्याने खासगी बसला मागणी
दिवाळीच्या काळात रेल्वेचे आरक्षण पूर्ण झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी खासगी बसचा पर्याय निवडला. याच वाढलेल्या मागणीचा फायदा घेत काही बसचालकांनी भाडेवाढ केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. आता प्रवाशांनी तिकिटाचा पुरावा जपून ठेवून जादा भाडे आकारल्यास आरटीओकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. या कारवाईमुळे खासगी बसच्या भाडेवाढीवर कितपत नियंत्रण येते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
