कुत्र्याच्या भुंकण्याने घाबरून घरात पळाली अन् काळाने घात केला! चुलीवरील गरम दुधामुळे तीन वर्षीय दुर्गाचा मृत्यू; दसऱ्याला साजरा केला होता वाढदिवस


बीड : घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावावर शोककळा पसरली आहे. दुर्गा असे या चिमुकलीचे नाव असून, कुत्रा भुंकल्याने घाबरून घरात पळताना चुलीवर तापवण्यासाठी ठेवलेले गरम दूध अंगावर पडल्याने तिचा मृत्यू झाला. अवघ्या तीन वर्षांच्या मुलीचा अशा प्रकारे अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा घरासमोर खेळत होती. त्याचवेळी एक कुत्रा भुंकत तिच्या दिशेने येऊ लागला. त्यामुळे घाबरलेली दुर्गा घरात पळाली. मात्र, घराच्या अंगणात चुलीवर तापवण्यासाठी ठेवलेल्या दुधाच्या पातेल्याला तिचा धक्का लागला. त्यामुळे गरम दुधाने भरलेले पातेले तिच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत ती गंभीररीत्या भाजली.

घटनेनंतर कुटुंबीयांनी दुर्गाला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी उपचार केले; परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान दुर्गाची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर नांदूर हवेली गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दसऱ्याला वाढदिवस साजरा केला, डॉक्टर होण्याचे होते स्वप्न!

दुर्गाच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, दसऱ्याच्या दिवशीच तिचा वाढदिवस होता. कुटुंबीयांनी तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. काही दिवसांपूर्वी घरात आनंदाचे वातावरण असताना आता त्याच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दुर्गाने वाढदिवसाच्या दिवशी मोठी झाल्यावर डॉक्टर व्हायचे असल्याचे सांगितले होते, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. चिमुकलीच्या भविष्यातील स्वप्नांबद्दल कुटुंबीयांच्या मनात अनेक अपेक्षा असताना या दुर्दैवी घटनेने सर्व काही हिरावून घेतले. अवघ्या तीन वर्षांच्या दुर्गाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमधूनही शोक व्यक्त केला जात आहे. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नांदूर हवेली गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!