पुणेकरांचा बसप्रवास होणार सुसाट! पीएमपीच्या ताफ्यात येणार २५०० नव्या बस, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन..

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पीएमपीएमएलच्या ताफ्यात पुढील वर्षभरात तब्बल २,५०० नव्या बस दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

मात्र, नव्या बस उभ्या करण्यासाठी जागा आणि त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व बस डेपोंमध्ये विद्युत पुरवठा, डांबरीकरण आणि संरक्षक भिंतींसह आवश्यक पायाभूत सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत.
पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात २,५०० नव्या बस


महापालिका आयुक्त कार्यालयात आयुक्त नवलकिशोर राम, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत नव्या बसच्या नियोजनासह बस डेपोंमधील पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला.
सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे १,९०० बस आहेत. या बसमधून दररोज ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, बसची अपुरी संख्या आणि गर्दीमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नव्या बस दाखल झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
७५० कोटींचा निधी; एक हजार सीएनजी बस दाखल होणार
पीएमपीच्या ताफ्यात एक हजार सीएनजी बस दाखल करण्यासाठी विविध संस्थांकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये पीएमआरडीएकडून ५०० कोटी रुपये, पुणे महापालिकेकडून १५० कोटी रुपये आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून १०० कोटी रुपये मिळणार आहेत. अशा प्रकारे एकूण ७५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
याशिवाय केंद्र सरकारच्या ई-ड्राइव्ह योजनेतूनही एक हजार सीएनजी बस मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मार्चअखेरपर्यंत एक हजार नव्या बस येणार
नियोजनानुसार, मार्चअखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नव्या बस दाखल होतील. त्यानंतर पुढील वर्षभरात आणखी दीड हजार बस दाखल करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचे अधिक पर्याय उपलब्ध होऊ शकतात.
बस डेपोंमधील सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश
नव्या बस दाखल होण्यापूर्वी त्यांना उभे करण्यासाठी पुरेशी जागा, विद्युत पुरवठा, डांबरीकरण, संरक्षक भिंती आणि देखभाल-दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या बस डेपोंमध्ये या सुविधा अपुऱ्या असल्याने नव्या बसचे व्यवस्थापन कसे करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना पायाभूत सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या बसच्या नियोजित आगमनापूर्वी डेपो तयार ठेवण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे.
