अल-निनोच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात पाणी कपातीचे नियोजन; स्थानिक स्वराज्य संस्थांना २० टक्के कपातीच्या सूचना

पुणे : अल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

खडकवासला प्रकल्पात १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मृतसाठा, बाष्पीभवन आणि बफर साठा वगळता अंदाजे २० टीएमसी पाणी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. हा साठा दरवर्षीच्या तुलनेत सुमारे २५ टक्क्यांनी कमी असल्याने पुणे शहरातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपातीची गरज असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांना २० टक्के कपातीच्या सूचना


पवना, भामा आसखेड, चासकमान आणि नीरा प्रणालीतील प्रकल्पांमध्ये ९० ते ९५ टक्के पाणीसाठा असला, तरी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीपुरवठा टिकवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी २० टक्के पाणी कपातीचे नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. रब्बी हंगामासाठी सिंचन आवर्तन दिले जाणार असून उन्हाळी सिंचनासाठी पुरेसा साठा शिल्लक राहण्याची शक्यता कमी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
अनधिकृत पाणी उपशावर कारवाई
पाणीचोरी रोखण्यासाठी महसूल, महावितरण, पोलीस आणि जलसंपदा विभागाची संयुक्त भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनधिकृत पाणी उपशासाठी वापरले जाणारे पंप जप्त करणे आणि पाणीचोरी आढळल्यास वीजजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. आगामी काळात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.
