मी आयुष्य संपवतोय…’ मेसेज अन् पोलीस अंमलदार अचानक गायब; पुणे पोलिसांची धावपळ, अखेर नारायणगावात सापडला

पिंपरी-चिंचवड : वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेला वाद, त्यानंतर ‘मी आयुष्य संपवतोय’ असा पाठवलेला संदेश आणि अचानक संपर्काबाहेर गेलेला पोलीस अंमलदार… या घटनाक्रमामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात एकच खळबळ उडाली. अंमलदाराचा संदेश मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आणि पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. अखेर काही तासांच्या शोधानंतर तो नारायणगाव परिसरातील एका बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत आढळला. मात्र, या घटनेमागील वाद आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे प्रकरण चर्चेत आले आहे.

गैरहजेरीवरून वरिष्ठांशी शाब्दिक चकमक
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस अंमलदार कामावर गैरहजर होता. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्याला जाब विचारला. गुरुवारी सकाळी याच मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे सांगितले जात आहे. या वादानंतर अंमलदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याने ‘मी आयुष्य संपवतोय’ असा आशयाचा संदेश पाठवला आणि तो अचानक निघून गेला.


संदेशानंतर पोलिसांची शोधमोहीम
संदेश पाठवल्यानंतर अंमलदाराशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याचा शोध सुरू केला. काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या आरटीपीसीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर अंमलदाराने पाठवलेल्या संदेशामुळे पोलिसांची चिंता वाढली. त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाची मदत घेण्यात आली.
नारायणगावातील बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत आढळला
शोध सुरू असताना संबंधित अंमलदार नारायणगाव परिसरातील एका बारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने तिथे जाऊन त्याला शोधून काढले. तो मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
वरिष्ठांकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप; चौकशी सुरू
या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अंमलदार यांच्यात नेमका काय वाद झाला, तसेच मानसिक त्रास दिला जात असल्याच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी सुरू असून, चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
