पुणेकरांसाठी मोठा दिलासा! म्हाडाच्या 4,462 घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; ‘ही’ आहे नवी तारीख


पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ४,४६२ घरांच्या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक नागरिकांना अर्ज करण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे.

या निर्णयानुसार आता २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. या सोडतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १,६७,५७० जणांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यापैकी १,०४,०८६ अर्ज अनामत रकमेसह यशस्वीरीत्या प्राप्त झाले आहेत.

कधीपासून सुरू झाली होती अर्ज प्रक्रिया?

म्हाडाच्या या गृहनिर्माण सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागांत घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

पुण्यातील ‘या’ भागांत मिळणार घरे

१५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी मांजरी खुर्द, म्हाळुंगे आणि भूगाव परिसरातील सदनिका उपलब्ध आहेत.

तर पुणे महानगरपालिका हद्दीतील २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबवेवाडी, मुंढवा, उंड्री, वडगाव, बावधन आणि कोंढवा खुर्द या भागांतील घरांचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवडमधील कोणत्या भागांत घरे उपलब्ध?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव या भागांतील सदनिकांचा समावेश आहे.

मुदतवाढ देण्यामागचं कारण काय?

म्हाडाच्या IHLMS 2.0 प्रणालीवर अर्जदारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची (Domicile Certificate) आणि उत्पन्नाच्या दाखल्याची पडताळणी MahaIT कडून केली जाते. तसेच आयकर विवरणपत्राची (Income Tax Return) पडताळणी आयकर विभागाकडून ऑनलाइन केली जाते. या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी येत असल्याने अर्जदारांना मुदतवाढ देण्यात आली होती.

यापूर्वी अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, प्रमाणपत्रांच्या पडताळणीतील अडचणी अद्याप कायम असल्याने म्हाडाने पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

सद्यस्थितीत ३,८७२ अधिवास प्रमाणपत्रे आणि ९,१४२ उत्पन्नाचे दाखले पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. या तांत्रिक अडचणींमुळे पात्र अर्जदारांचे नुकसान होऊ नये, यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या नागरिकांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!