पुण्यातील भाजप नगरसेवकांना फडणवीसांचा थेट इशारा! ‘आधी कामाचा हिशोब द्या, मगच पदाचा विचार’

पुणे : भाजपमध्ये पद मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगिरीचा आरसा दाखवल्याची चर्चा आहे. ‘आधी काम दाखवा, मग पद मागा’, असा स्पष्ट संदेश देत त्यांनी पदाची मागणी करणाऱ्या नेत्यांच्या कामाचा हिशोब तपासण्याची भूमिका मांडल्याचे सांगितले जात आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमुळे भाजपमधील पदांसाठीच्या स्पर्धेकडे लक्ष वेधले गेले आहे.

पद मागण्याआधी कामाचा हिशोब द्यावा लागणार!
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे सर्व नगरसेवक, आमदार आणि मंत्री उपस्थित होते. आगामी काळात पक्षात विविध पदे मिळवण्यासाठी नगरसेवकांमध्ये सुरू असलेली स्पर्धा लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यावर भर दिला.


नगरसेवकांनी आपल्या प्रभागात किती विकासकामे केली, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणते प्रयत्न केले आणि पक्षासाठी काय योगदान दिले, याची माहिती महत्त्वाची ठरणार आहे. केवळ वरिष्ठांकडे मागण्या करणे किंवा पक्षांतर्गत गटबाजी आणि लॉबिंगच्या माध्यमातून पद मिळवण्याचा प्रयत्न करणे पुरेसे ठरणार नाही, असा संदेश या बैठकीतून देण्यात आल्याचे सांगितले जाते.
फडणवीसांचा स्पष्ट संदेश; रिपोर्ट कार्ड तपासूनच निर्णय!
‘उद्या माझ्याकडे पद मागायला आलात, तर सर्वात आधी तुमचं रिपोर्ट कार्ड काढेल. तुम्ही किती आणि कसं काम केलं, याचा आढावा घेतल्यानंतरच पुढचा विचार केला जाईल,’ असा इशारा फडणवीस यांनी दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी काळात पदवाटप करताना केवळ मागणी किंवा राजकीय जवळीक नव्हे, तर प्रत्यक्ष कामगिरीला महत्त्व दिले जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.
पदवीधर-शिक्षक निवडणुकीत विजयासाठीही सूचना
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाचे लक्ष्यही नगरसेवकांसमोर ठेवले. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे, मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि प्रत्येकाने आपल्या भागात निवडणुकीच्या कामासाठी सक्रिय व्हावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
त्यामुळे पुण्यातील भाजप नगरसेवकांसमोर आता निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासोबतच स्वतःच्या कामाची कामगिरी सिद्ध करण्याचे आव्हान आहे. पदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले जाणार असल्याच्या संदेशामुळे पक्षातील आगामी पदवाटपाबाबत उत्सुकता वाढली आहे.
