महामार्गावर अपघात होताच मदतीला येणार ‘आकाशदूत’! हवाई रुग्णवाहिकेमुळे गोल्डन अवरमध्ये वाचणार जीव

मुंबई : राज्यातील महामार्गांवरील वाढते रस्ते अपघात आणि अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.

गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला.
अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळणार?


रस्ते अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ जखमींच्या उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात रुग्णाला योग्य वैद्यकीय सुविधा मिळाल्यास त्याचे प्राण वाचवण्याची शक्यता वाढते. मात्र, महामार्गावरील वाहतूक कोंडी, रुग्णालयांचे अंतर आणि आपत्कालीन सुविधांची मर्यादित उपलब्धता यामुळे अनेकदा उपचारांना विलंब होतो.
ही समस्या दूर करण्यासाठी राज्यातील तीन प्रमुख महामार्गांवर हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. यामध्ये समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गाचा समावेश आहे.
नोव्हेंबरमध्ये प्रक्रिया, नवीन वर्षात सेवा सुरू करण्याचे नियोजन
या प्रकल्पासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती तयार करून मंजुरी घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेनंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे.
राज्यात दरवर्षी सुमारे १५ हजार रस्ते अपघात होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर अपघातांतील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी अधिक सक्षम आपत्कालीन यंत्रणा उभारण्यावर भर दिला जात आहे.
समृद्धी, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गांवर विशेष व्यवस्था
या तीन महामार्गांवर हवाई रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना शक्य तितक्या लवकर ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था विकसित केली जाणार आहे. त्यासाठी रुग्णवाहिका सेवेची उपलब्धता, जखमींचे सुरक्षित स्थलांतर आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
परिवहन, आरोग्य आणि पोलीस विभाग एकत्र काम करणार
हवाई रुग्णवाहिका सेवा प्रभावीपणे सुरू करण्यासाठी परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून प्रमाणित कार्यपद्धती तयार केली जाणार आहे. यामध्ये ट्रॉमा केअर सेंटरचे जाळे निश्चित करणे, सेवा पुरवठादारांचे पॅनेल तयार करणे, रस्ता सुरक्षा निधीतून आर्थिक तरतूद करणे आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम बनवणे या बाबींचा समावेश आहे.
‘प्रत्येक जीव अनमोल’; मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
अपघात रोखण्याबरोबरच अपघातानंतर जखमींना वेळेत उपचार मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मदत पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीत स्पष्ट केले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने महामार्गांवरील आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू झाल्यास गंभीर अपघातांतील जखमींना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी मदत होण्याची अपेक्षा आहे.
