‘दोन वर्षांत हिंदू संपतील…’ तरुणीला धर्मांतरासाठी दबाव? मैत्रिणीच्या ओळखीतून नालासोपाऱ्यातील धक्कादायक प्रकरण उघडकीस


नालासोपारा : मैत्रिणीच्या ओळखीतून सुरू झालेली ओळख, लग्नाचे आश्वासन आणि त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोप… नालासोपारा येथे एका तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे. ‘दोन वर्षांत हिंदू संपतील, त्यामुळे लवकर धर्मांतर कर’, असे सांगितल्याचा दावाही तरुणीने केला आहे. या प्रकरणात एका तरुणासह त्याच्या नातेवाइकावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची ओळख तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून आरिफ शेख याच्याशी झाली. त्यानंतर आरिफने प्रेमसंबंध निर्माण करून लग्नाचे आश्वासन दिल्याचा आरोप तरुणीने केला आहे. पुढे त्याने तिला आई रुक्साना शेख हिच्याकडे नेले. रुक्साना या ज्योतिषविद्या जाणत असल्याचे आरिफने सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

तरुणीच्या आरोपानुसार, रुक्साना यांनी तिच्या आईचा मृत्यू झाला असून तिच्या घरात भूत आहे, तसेच कुटुंबातील सदस्य तिचे शत्रू असून ते तिला मारून टाकतील, अशी भीती घातली. यानंतर तरुणीवर त्यांच्या घरी राहण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे.

लग्नाचे आश्वासन देऊन अत्याचार केल्याचा आरोप

तक्रारीनुसार, १ एप्रिल २०२५ पासून तरुणी आरिफच्या घरी राहू लागली. या काळात लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. त्यानंतर ५ मे २०२५ रोजी दोघे दुसऱ्या भाड्याच्या घरात राहायला गेले. त्या ठिकाणी केवळ हिंदूंनाच खोल्या दिल्या जात असल्याने आरिफने स्वतःला तिचा भाऊ असल्याचे भासवले आणि दोघे प्रत्यक्षात एकत्र राहत असल्याचा दावा तरुणीने केला आहे.

चुलत भावावरही गंभीर आरोप

जुलै २०२५ मध्ये आरिफचा चुलत भाऊ साहिल खान याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तिने विरोध केल्यानंतर आरिफ आणि साहिल या दोघांनी तिला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.

इतकेच नव्हे, तर गोमांस खाण्यास आणि हिजाब परिधान करण्यास दबाव आणण्यात आला, तसेच धर्मांतरास नकार दिल्यास मारहाण केली जात असल्याचा आरोपही तरुणीने केला आहे. ‘दोन वर्षांत हिंदू संपतील, त्यामुळे लवकर धर्मांतर कर’, असे आरिफने म्हटल्याचा दावा तिने तक्रारीत केला आहे.

७० ते ८० हिंदू तरुणींना लक्ष्य केल्याचा दावा

या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर आरोप म्हणजे आरिफ एका मोठ्या टोळीचा भाग असल्याचा तरुणीचा दावा. या टोळीकडून तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील छायाचित्रे काढली जात आणि त्याद्वारे पैसे उकळले जात असल्याचा आरोप तिने केला आहे. आरिफने ७० ते ८० हिंदू तरुणींना लक्ष्य केल्याचे सांगितल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. नवरात्र आणि गणेशोत्सवाच्या काळात हिंदू तरुणींना विशेषतः लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही तिने केला आहे.

१२ ऑक्टोबरला पोलिसांत तक्रार

या प्रकरणी तरुणीने १२ ऑक्टोबर रोजी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. या तक्रारीनंतर प्रकरण चर्चेत आले असून, यामध्ये आणखी पीडित तरुणी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. तक्रारीतील दावे आणि संबंधित व्यक्तींवरील आरोपांची सत्यता तपासाच्या निष्कर्षांनंतरच स्पष्ट होईल. पोलिसांकडून पुढील तपासात नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!