पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार अडचणीत? शिंदे गटाच्या संघटनेचा मतदानावर बहिष्कार, नेमकं काय घडलं?

पुणे : राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाच मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार असून, पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर मतदारसंघाचा त्यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, या पाचही मतदारसंघांमध्ये कमी-अधिक प्रमाणात बंडखोरी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. अमरावती मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या तीन जणांवर भाजपने कारवाई केली असून, त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाच्या संघटनेचा बहिष्कार


दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या मतदारसंघावर शिवसेनेच्या शिंदे गटाने दावा केला होता. मात्र, महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले शिंदे गटाचे मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
मात्र, महायुतीमध्ये ही जागा भाजपला मिळाल्यानंतरही अर्ज दाखल केलेल्या मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली. तरीही शिवसैनिकांमधील नाराजी कायम असल्याचं दिसून येत आहे. आता एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेने पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
१० हजार सभासद मतदान करणार नाहीत, संघटनेची भूमिका
शिवसेनेच्या शिंदे गटाशी संबंधित असलेल्या एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेने मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला समर्थन दिलं होतं. मात्र, चिवटे यांना ऐनवेळी उमेदवारी मागे घ्यावी लागल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
“आमच्या १० हजार सभासदांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही महायुतीचे घटक असून, आमच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही मतदानावर बहिष्कार घालत आहोत,” अशी भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.
मंगेश चिवटे मागील दोन वर्षांपासून शिक्षकांसाठी काम करत होते. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर अन्याय झाल्याची भावना संघटनेने व्यक्त केली आहे. चिवटे यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा दावाही संघटनेकडून करण्यात आला आहे.
“आमची नाराजी आता दूर होणार नाही, कारण त्यासाठीची वेळ निघून गेली आहे,” असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीसमोरील अडचणी वाढणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
