सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं; सामान्यांच्या खिशाला मोठा फटका, ‘या’ कंपन्यांनी अचानक वाढवले दर, किती रुपयांनी महागलं इंधन?

मुंबई : सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसमोर आता इंधन दरवाढीचं संकट उभं राहिलं आहे. खासगी इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ केल्याने ग्राहकांना आता इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ब्रिटिश ऊर्जा कंपनी बीपी यांची संयुक्त कंपनी असलेल्या जिओ-बीपीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपये, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ केली आहे. हे नवे दर ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून लागू झाले आहेत. त्यामुळे जिओ-बीपीच्या पेट्रोल पंपांवर इंधन भरणाऱ्या ग्राहकांच्या खर्चात वाढ होणार आहे.
यापूर्वी खासगी इंधन कंपनी नायरा एनर्जीनेही पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ केली होती. आता जिओ-बीपीनेही दर वाढवल्याने इतर पेट्रोल पंपांवरील दरांतही वाढ होणार का, असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे.


पेट्रोल-डिझेलचे नवे दर किती?
मिंटच्या वृत्तानुसार, जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर पंजाबमध्ये पेट्रोलचा दर अंदाजे १०८.५४ रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचा दर ९९.१९ रुपये प्रतिलिटर झाला आहे. हरियाणामध्ये जिओ-बीपीच्या पंपांवर पेट्रोलचा दर अंदाजे १०९.८० रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचा दर ९७.७५ रुपये प्रतिलिटर असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
यंदा पहिल्यांदाच दरवाढ
देशात २,२२७ पेट्रोल पंप असलेल्या जिओ-बीपीने यावर्षी पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ केल्याचे वृत्त आहे. पश्चिम आशियातील संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेलपुरवठ्यातील व्यत्ययांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. परिणामी, खासगी इंधन विक्रेत्यांच्या नफ्यावर परिणाम होत असल्याने कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
सरकारी तेल कंपन्यांचे दर स्थिर
खासगी कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवले असले, तरी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या सरकारी तेल कंपन्यांच्या पंपांवरील नियमित पेट्रोल आणि डिझेलचे दर तूर्तास स्थिर असल्याचे वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे खासगी आणि सरकारी पेट्रोल पंपांवरील दरांमध्ये फरक वाढला आहे.
दरम्यान, इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी ग्राहकांनी आपल्या जवळच्या पंपावरील लागू असलेले दर तपासून घ्यावेत.
