‘आम्ही वाघ आहोत, गाढव नाही’; MPSC आंदोलन जिंकताच विवेकानंद पाटील यांचा नवनाथ बन यांच्यावर थेट वार..

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर रविवारी मध्यरात्री आंदोलन स्थगित करण्यात आले.

या आंदोलनात विद्यार्थ्यांची बाजू आक्रमकपणे मांडणारे विवेकानंद पाटील यांनी विजयाचा आनंद व्यक्त करत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि विक्रम पाचपुते यांच्यावर निशाणा साधला. आंदोलनादरम्यान या नेत्यांसोबत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे.
‘आम्ही वाघ आहोत, गाढव नाही’; विवेकानंद पाटील यांचा टोला


एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान विवेकानंद पाटील आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यात शाब्दिक वाद रंगला होता. आंदोलनातील विद्यार्थ्यांना लक्ष्य केल्याचा आरोप करत पाटील यांनी आता आंदोलनातील यशानंतर प्रत्युत्तर दिले आहे.
“ज्यांना ही गाढवं अर्बन नक्षल वाटत होती, त्यांना मी सांगू इच्छितो की, भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली. तसेच, “मी नवनाथ बनला सांगेन, आम्ही वाघ आहोत, गाढव नाहीत, शिकार केलीये. कोणाच्या पण नादाला लागायचं, आमच्या नादाला लागायचं नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतल्याबद्दल विवेकानंद पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. निर्णय घेण्यास वेळ लागला असला, तरी सरकारने संवेदनशीलता दाखवल्याचे त्यांनी म्हटले. शिवेंद्रराजे भोसले यांचेही त्यांनी आभार मानले.
आंदोलनातील मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. चौकशीसाठी सरकारला ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला असून, तोपर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार पदावर नसतील, असेही त्यांनी सांगितले. भीमनवार यांनी आता कायमची सुट्टी घ्यावी, असे वक्तव्य करत त्यांनी राजीनाम्याच्या मागणीचाही पुनरुच्चार केला.
MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या?
सरकारने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.
चौकशी समितीची स्थापना : आयोगाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर : चौकशी पूर्ण होईपर्यंत आयोगाचे अध्यक्ष पदावर कार्यरत राहणार नाहीत.
दोन महिन्यांत चौकशी : दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीला चौकशीसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांचाही समितीत समावेश आहे.
विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन : आंदोलनादरम्यान दाखल झालेली प्रकरणे मागे घेण्याबाबत सरकारने आश्वासन दिले आहे.
७० हजार पदांची भरती : पुढील तीन वर्षांत ७० हजार रिक्त पदे भरण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
गट-क पदांमध्ये वाढ : २०२७ मध्ये होणाऱ्या गट-क भरतीतील पदांची संख्या वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
तहसीलदार भरतीतील प्रमाणात बदल : ६०-४० ऐवजी ५०-५० प्रमाण ठेवण्याबाबत सहमती दर्शवण्यात आली आहे.
आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ : आयोगातील सदस्यांची संख्या ११ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षा ऑफलाइन पद्धतीने : एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम : पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.
‘आता विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे’
आंदोलनाला यश मिळाल्यानंतर विवेकानंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. आगामी परीक्षांचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांनी तयारीला लागावे, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावरची लढाई यापुढेही आपण लढत राहू, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
दरम्यान, आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि रिक्त पदांची भरती या मुद्द्यांवरून सुरू झालेल्या आंदोलनानंतर सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कशी होते, याकडे आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
