सोमेश्वरच्या सत्तेचा फैसला आज! सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, जगतापांच्या बंडखोरीचा किती परिणाम? निकालातून उलगडणार राजकीय समीकरणं


बारामती : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे केवळ कारखान्याच्या सभासदांचेच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रात होत असलेल्या या पहिल्याच महत्त्वाच्या निवडणुकीमुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. आता २१ संचालकपदांसाठी झालेल्या या निवडणुकीत सभासदांनी कोणाला कौल दिला, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

२१ जागांसाठी तिरंगी लढत; तीन पॅनेलमध्ये चुरस

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले. कारखान्याच्या एकूण २७ हजार ६२५ मतदारांपैकी २३ हजार ३९३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत ८४.२५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या निवडणुकीत तीन पॅनेल आमनेसामने आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरे पॅनेल रिंगणात होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या मदतीने स्वतंत्र पॅनेल उभे केले. ‘लोकनेते अजितदादा पवार पॅनेल’च्या माध्यमातून त्यांनी आव्हान दिले.

सुनेत्रा पवारांनी आठ दिवस कारखाना परिसरात ठोकला मुक्काम

या निवडणुकीच्या प्रचारात सुनेत्रा पवार यांनी विशेष लक्ष घातले होते. त्यांनी सलग आठ दिवस कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मुक्काम करून विविध भागांत प्रचार केला. निवडणुकीची धुरा सांभाळताना त्यांनी सभासदांशी संपर्क साधण्यावर भर दिला. युवा नेते जय पवार यांनीही प्रचारासाठी दौरे करत तरुणांशी संवाद साधला. खासदार पार्थ पवार यांनी पडद्यामागून निवडणुकीचे नियोजन आणि रणनीती आखल्याचे चित्र होते.

दरम्यान, पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा परिणाम मतदानावर झाला आहे का, याचे उत्तर निकालातून मिळणार आहे. तसेच युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला सभासदांचा किती पाठिंबा मिळाला, हेही स्पष्ट होईल.

९३ टेबलांवर मतमोजणी; सायंकाळपर्यंत निकालाची शक्यता

माळेगाव येथील अजिंठा मॅजेस्टिक हॉलमध्ये आज सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. एकूण ९३ टेबलांवर एकाच फेरीत मतमोजणी करण्याचे नियोजन आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे साडेचारशे कर्मचारी तैनात करण्यात आले असून, पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

आता उत्सुकता एका प्रश्नाचीच! सोमेश्वर कारखान्याची सत्ता कोणाच्या हाती जाणार? सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला सभासदांचा कौल मिळणार, युगेंद्र पवारांच्या पॅनेलला यश मिळणार की पुरुषोत्तम जगताप यांच्या बंडखोरीला मतदारांचा पाठिंबा मिळणार? या निकालातून बारामतीच्या सहकार क्षेत्रातील पुढील राजकीय समीकरणांची दिशा स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!