‘उद्धव ठाकरेंप्रमाणे शिंदेंचाही कारभार’; ज्येष्ठ नेता नाराज होताच एकनाथ शिंदे संतापले, थेट म्हणाले, ‘आम्हाला विचार करावा लागेल…’

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या नाराजीच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आपण नाराज असल्याचं कीर्तिकर यांनी जाहीरपणे सांगितलं होतं.
एकनाथ शिंदे आपल्याला भेटत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी तुलना केली होती. मात्र, नाराज असलो तरी पक्ष सोडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. या वक्तव्यामुळे शिवसेनेत अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली.

कीर्तिकरांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे संतापले


गजानन कीर्तिकर यांच्या नाराजीच्या बातम्या आणि ते पुन्हा ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्याचं सांगितलं जात आहे. ‘असं असेल तर आम्हाला विचार करावा लागेल. कीर्तिकर यांचा संध्याकाळी कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला जायचं की नाही, हेही आम्हाला ठरवावं लागेल. घडलेल्या घटनेवर खुलासा करा,’ अशी भूमिका शिंदे यांनी मांडल्याची माहिती समोर आली आहे.
‘पत्रकारांशी जास्त मैत्री करू नका’
यावेळी एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांना सल्लाही दिला. ‘पत्रकारांशी जास्त मैत्री करू नका. इथे डॅमेज कंट्रोल करायला मी बसलो आहे. शिवसेना हे एक कुटुंब आहे. मुख्यमंत्री असतानाही मी चीफ मिनिस्टर नाही, तर कॉमन मॅन म्हणून राहिलो,’ असं शिंदे म्हणाल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी कीर्तिकर यांच्याशी संपर्क साधून संवाद साधला. त्यानंतर कीर्तिकर यांची नाराजी दूर झाल्याचं सांगितलं जात आहे.
शिंदेंचा फोन येताच कीर्तिकरांची भूमिका स्पष्ट
एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकांची कामं करून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क होत नव्हता. मात्र, आता शिंदे यांनी आपल्या ओएसडींना संपर्काची व्यवस्था करण्यास सांगितल्याचं कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं. आपण शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
‘मी नाराज नाही, पक्ष सोडण्याची इच्छा नाही’
दरम्यान, दिवसभर वृत्तवाहिन्यांवर आपल्या नाराजीच्या आणि पक्ष सोडण्याच्या बातम्या पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याचं कीर्तिकर म्हणाले. ‘मी महाराष्ट्राला माझं मत सांगायला आलो आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी समाधानाने काम करत आहे. गोव्यात प्रभारी म्हणून काम पाहत आहे. माझ्याबाबत आलेल्या बातम्या निराधार आहेत. पक्ष सोडण्याची माझी कोणतीही इच्छा नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
‘काँग्रेससोबत असलेल्या लागेबांध्यांमुळे मी जुना पक्ष सोडला. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावाला मी साथ दिली. आता समाधानाने शिवसेनेत काम करत आहे. दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याची माझी इच्छा नाही. एकनाथ शिंदे यांनी फोन करून माझ्याबाबत विचारपूस केली. त्यावेळीही मी नाराज नसल्याचं आणि पक्ष सोडणार नसल्याचं त्यांना सांगितलं,’ अशी माहिती गजानन कीर्तिकर यांनी दिली.
त्यामुळे कीर्तिकर यांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं चित्र आहे. मात्र, त्यांच्या सुरुवातीच्या वक्तव्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
