शेतकरी आंदोलनाप्रमाणेच CJP आंदोलनातही रस्त्यांवर खिळे, दिल्लीच्या सीमांवर सिमेंट बॅरिकेड्स; ‘जंतर मंतर 2.0’ साठी Gen-Z रस्त्यावर, अनेकांना घेतलं ताब्यात

नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि एसआयआर प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी करत दिल्लीमध्ये आंदोलन सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. कॉकरोच जनता पक्षाच्या समर्थकांनी जंतर मंतर आणि कनॉट प्लेस परिसरात जमण्यास सुरुवात केली आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत १५० जणांना ताब्यात घेतलं असून, आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विविध भागांत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर केला जात आहे.


दिल्लीच्या सीमांवर बॅरिकेडिंग, रस्त्यांवर खिळे
आंदोलन रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर सिमेंटचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवर खिळे पसरवण्यात आल्याचं वृत्त आहे. यामुळे दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या सुरक्षा व्यवस्थेची चर्चा सुरू झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये बीएसएफच्या जवानांसह ३८ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याचा दावा करण्यात आला आहे. नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर येणाऱ्या २५० मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. याशिवाय, राजधानीतील ४५ मेट्रो स्थानकं बंद करण्यात आल्याचं वृत्त आहे. आंदोलकांना ताब्यात ठेवण्यासाठी १० नजरकैद केंद्रे उभारण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.
इंडिया गेटच्या चार किलोमीटर परिसरात शुक्रवार रात्री १० वाजल्यापासून शनिवार रात्री १० वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अभिजीत दीपके यांचा सरकारवर निशाणा
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांनी सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तरुणांना आणि देशातील नागरिकांना सरकार इतकं का घाबरतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“सर्व रेल्वे बंद करण्याची काय गरज होती? मेट्रो बंद करण्याची काय गरज होती? इंटरनेट बंद केलं, रस्ते बंद केले,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. जम्मू-काश्मीर आणि नक्षलग्रस्त भागांतून सुरक्षा दलांना दिल्लीत तैनात केल्याचा दावाही त्यांनी केला.
दिल्ली-नोएडा सीमेवर वाहतूक सुरू
दिल्ली-नोएडा सीमेवर वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. काही भागांत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांसोबत बीएसएफचे जवानही तैनात आहेत.
ड्रोनद्वारे पाळत, अनेक भागांत सुरक्षा वाढवली
दिल्लीतील जंतर मंतरसह विविध संवेदनशील भागांत ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे. संभाव्य गर्दी आणि आंदोलनाच्या हालचाली लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. काही भागांत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
सौरव दास यांचं आंदोलनाबाबत मोठं विधान
या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सौरव दास यांनी लोकशाही आणि तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा उपस्थित केला. “हा आपला देश परत मिळवण्याचा लढा आहे! हा आपली लोकशाही वाचवण्याचा लढा आहे! हा जनरेशन-Z च्या भविष्यासाठीचा लढा आहे,” असं ते म्हणाले.
भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काही तासांत जंतर मंतर आणि परिसरात भेटण्याचं आवाहन करत त्यांनी हा दीर्घकाळ चालणारा लढा असल्याचं म्हटलं.
दरम्यान, आंदोलन, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक निर्बंध आणि सार्वजनिक सेवांवरील परिणाम याबाबत समोर येणाऱ्या दाव्यांची अधिकृत स्रोतांकडून पडताळणी होणं महत्त्वाचं आहे. दिल्लीतील परिस्थिती आणि प्रशासनाकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
