अजितदादा गटावर पैसे वाटपाचा आरोप; बारामतीत नेमकं काय घडलं? नगराध्यक्षांच्या गाडीत २० लाख…

बारामती : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारखान्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू असतानाच आता पैशांच्या कथित वाटपावरून राजकीय वातावरण तापलं आहे.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या निवडणुकीत अजित पवार गटावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांच्या गाडीत २० लाख रुपये सापडल्याचा दावा पुरुषोत्तम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मध्यरात्री सभासदांना पैसे वाटप केले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे.


या प्रकरणावर आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप काय भूमिका मांडतात आणि कोणते खुलासे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पैसे सापडल्याचा आणि वाटपाचा आरोप अद्याप आरोपांच्या स्वरूपात असून, त्याबाबतची अधिकृत पुष्टी समोर आलेली नाही.
उद्या सोमेश्वर कारखान्यासाठी मतदान
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. कारखान्याच्या २१ जागांसाठी उद्या, ११ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या अगदी आधी पैशांच्या कथित वाटपाचे आरोप झाल्याने निवडणुकीला वेगळे वळण मिळाले आहे. बारामतीतील या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कारखान्यावर कोणाचे वर्चस्व राहणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘दोन तास गेटवर थांबलो, तरी भेट झाली नाही’; पुरुषोत्तम जगतापांचा दावा
दरम्यान, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी काल मतदारांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी कारखान्याच्या प्रगतीचे श्रेय दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाला आणि मार्गदर्शनाला दिले.
“आज आपल्याला जे वैभव दिसत आहे, ते दादांची दूरदृष्टी, त्यांचं नेतृत्व, मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेल्या साथीमुळे उभं राहिलं आहे,” असं जगताप म्हणाले.
सोमेश्वर कारखान्याने प्रतिटन ३,८०० रुपयांचा दर जाहीर केला असून, हा राज्यातील सर्वाधिक दर असल्याचा दावाही त्यांनी केला. आपण गेल्या ३४ वर्षांपासून कारखान्यात संचालक म्हणून काम करत असून, १३ वर्षे चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळल्याचं त्यांनी सांगितलं.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण मुंबईतील देवगिरी निवासस्थानी गेलो होतो, असा दावाही जगताप यांनी केला. मात्र, तेथे गेट बंद असल्याने निरोप देऊनही आपली भेट होऊ शकली नाही. आपण तब्बल दोन तास गेटवर थांबलो, पण भेट न झाल्याने परत आलो, असं जगताप यांनी सांगितलं.
एकीकडे कारखान्याच्या निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप, तर दुसरीकडे मतदानाची तारीख जवळ आल्याने सोमेश्वरमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
