‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’, गोड बोलून जाळ्यात ओढलं; मंत्रालयातील उच्चशिक्षित महिला अधिकाऱ्याला १८ लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?


मुंबई : मंत्रालयात काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला मॅट्रिमोनिअल साईटवरून जोडीदार शोधणं चांगलंच महागात पडलं आहे. लग्नाचं आमिष दाखवून या महिला अधिकाऱ्याची तब्बल १७ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

आपण यूके आणि कॅनडाचे नागरिक असल्याचं भासवून आरोपींनी महिलेला विश्वासात घेतलं आणि वेगवेगळी कारणं सांगत तिच्याकडून ऑनलाइन पैसे उकळले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील एका विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या या महिलेने योग्य जोडीदाराच्या शोधात मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर आपलं प्रोफाईल तयार केलं होतं. या प्रोफाईलच्या आधारे एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. आपण यूकेचे नागरिक असून लग्नासाठी इच्छुक असल्याचं सांगत त्याने काही दिवस ऑनलाइन चॅट करून महिलेचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर भेटवस्तू, कस्टम क्लिअरन्स आणि इतर वैयक्तिक कारणांचा बनाव रचून त्याने महिलेकडे पैशांची मागणी सुरू केली. या कारणांवर विश्वास ठेवून महिलेने ऑनलाइन पैसे पाठवले.

दरम्यान, आणखी एका व्यक्तीनेही महिलेशी संपर्क साधला. आपण कॅनडाचे रहिवासी असल्याचं भासवत त्याने लग्नाची तयारी दर्शवली. त्यानंतर कौटुंबिक अडचणी आणि आपत्कालीन परिस्थितीची खोटी कारणं सांगून त्यानेही महिलेकडून ऑनलाइन पैसे घेतले.

टप्प्याटप्प्याने १७ लाख ९७ हजार रुपये उकळले

या दोन्ही आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याने महिलेकडून टप्प्याटप्प्याने तब्बल १७ लाख ९७ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आले. मात्र, आरोपींकडून वारंवार पैशांची मागणी होऊ लागली आणि लग्नाबाबत टाळाटाळ केली जाऊ लागली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं.

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित महिलेने मुंबईच्या दक्षिण प्रादेशिक विभागातील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

बँक खाते क्रमांक आणि फोन नंबर्सच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मॅट्रिमोनिअल साईटवर ओळख झालेल्या व्यक्तींवर विश्वास ठेवून पैसे पाठवताना सतर्क राहण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!