सरकारकडून सोने खरेदी न करण्याचे आवाहन, तरीही दागिने कंपनीचा महसूल वाढला; २२ टक्क्यांची थेट झेप…


नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर सातत्याने कमी होत असल्याने ग्राहकांचे लक्ष सराफा बाजाराकडे लागले आहे. अशातच दागिने विक्री क्षेत्रातील पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या महसुलात आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, जडवलेल्या दागिन्यांची वाढती मागणी आणि किरकोळ व्यवसायातील वाढता वाटा यामुळे महसुलात वाढ झाली आहे. या तिमाहीत पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सने दोन नवीन दुकाने सुरू केली आहेत.

यामध्ये गुरुग्राममधील स्टोअर आणि पुण्यातील अमनोरा मॉलमधील यू स्टोअरचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत कंपनीची एकूण ८० दुकाने होती. यापैकी ७९ दुकाने भारतात, तर एक दुकान अमेरिकेत आहे.

कंपनीकडून विस्तारावर भर

पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सने आगामी काळात आणखी २३ नवीन दुकाने सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास वर्षाच्या अखेरीस कंपनीच्या दुकानांची संख्या सुमारे १०३ पर्यंत पोहोचू शकते. अयोध्या आणि प्रयागराज येथेही कंपनीकडून नवीन दुकाने सुरू केली जाणार आहेत.

दरम्यान, सरकारकडून सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले जात असल्याची चर्चा असतानाही ग्राहकांकडून सोन्याच्या खरेदीला पसंती दिली जात असल्याचे चित्र दिसत आहे. सोन्याच्या दरातील चढ-उतार आणि दागिन्यांच्या मागणीचा आगामी काळात सराफा बाजारावर काय परिणाम होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!