१२०० एकर जमीन प्रकरण तापलं; जावयाच्या कंपनीवरून सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या, म्हणाल्या माझा जावई…


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या जावयाच्या कंपनीला १२०० एकर सरकारी जमीन देण्यात आल्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित करत सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. दरम्यान, आता सुप्रिया सुळे यांनी दमानिया यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे.

अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या जमीन व्यवहाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीला १२०० एकर जमीन? वाचून धक्काच बसला. दोन आठवड्यांत दोन जीआर आहेत. त्यामुळे काही अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होतात,” असं त्यांनी म्हटलं आहे.

दमानिया यांनी या प्रकरणात निविदा का काढण्यात आली नाही, असा सवाल केला आहे. १२०० एकर सरकारी जमीन आणि कोट्यवधी रुपयांचा व्यवहार असताना निविदा प्रक्रिया का टाळण्यात आली? स्पर्धात्मक निविदा काढली असती तर सरकारला अधिक भाडे मिळालं नसतं का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

जून महिन्यात ही जमीन महाऊर्जामार्फत सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर ग्रीन एनर्जी पार्कसाठी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, अवघ्या तीन महिन्यांत सप्टेंबरमध्ये हीच १२०० एकर जमीन थेट एका खासगी कंपनीला देण्याचा निर्णय का घेण्यात आला? हा बदल कोणाच्या सांगण्यावरून झाला? तसेच संबंधित शासन निर्णयात या बदलाचं कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

सुप्रिया सुळेंचा पलटवार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अंजली दमानिया यांच्या आरोपांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझा जावई काय करतो? हा त्याचा प्रश्न आहे. मी त्याच्यावरती कसं बोलणार?”

यानंतर सुप्रिया सुळे यांनी महिलांच्या राजकीय सहभागाचा मुद्दाही उपस्थित केला. महिलांनी निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊन देशाच्या उन्नतीत योगदान दिलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतल्यामुळे महिला सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौर झाल्या. मुंबईच्या महापौरपदावर महिला विराजमान होण्यामागेही शरद पवार यांचा निर्णय असल्याचं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

“महिलांना सत्तेत बसण्याची संधी शरद पवार यांच्या एका निर्णयामुळे मिळाली. आतापर्यंत महिला आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी का झाली नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, १२०० एकर जमीन प्रकरणी अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सरकारकडून आणि संबंधित कंपनीकडून पुढे काय स्पष्टीकरण दिलं जातं, याकडे आता लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!