युगेंद्र पवारांनीच दिला ‘एकत्र येण्याचा’ प्रस्ताव, पार्थदादांनी कार्यकर्त्यांचं कारण सांगितलं; शेवटपर्यंत वाट पाहूनही का बिघडलं? जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीआधी पवार कुटुंबातील पडद्यामागची एक महत्त्वाची चर्चा आता समोर आली आहे. युगेंद्र पवार यांनीच आपण एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांचा हवाला देत वेगळी भूमिका घेतल्याचा दावा जय पवार यांनी केला. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीत पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
जय पवार यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी सुप्रिया आत्यांच्या घरी बहिण रेवतीला भेटण्यासाठी गेलो असताना सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवर चर्चा झाली. त्यावेळी युगेंद्र पवार यांनी ‘आपण सोमेश्वरसाठी एकत्र यायचं का?’ असा प्रश्न केला. त्यावर पार्थ पवार यांनी, ‘युगेंद्र, आमचे कार्यकर्ते आम्हाला असं करू नका, असं सांगत आहेत. हे कार्यकर्ते आमच्यासाठी झटतात, त्यामुळे आम्हाला त्यांचं ऐकावं लागतं,’ असं सांगितल्याचं जय पवार यांनी स्पष्ट केलं.

यानंतरही शेवटपर्यंत काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती, असं जय पवार म्हणाले. मात्र, पुरुषोत्तम जगताप यांच्या मनात वेगळंच असल्याचा आरोप करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिली, पण जगतापांच्या मनात काहीतरी वेगळं होतं. दादांचं कुटुंब म्हणजे आपण सगळेच आहोत, पण आम्हा सगळ्यांना जगतापांनी डावललं,’ असं जय पवार म्हणाले.


या निवडणुकीच्या निमित्ताने जय पवारांनी अजित पवारांच्या आठवणींनाही उजाळा दिला. अपघाताच्या वेळी दादांकडे जनतेच्या कामांची कागदपत्रं होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते जनतेसाठी काम करत होते, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या निधनानंतर राजकारण सोडून आईला वेळ द्यावा, असा विचार मनात आला होता. मात्र, दादांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या जनतेचं प्रेम पाहिल्यानंतर जनसेवेचा मार्ग पुढे नेण्याचा निर्णय घेतल्याचं जय पवारांनी सांगितलं.
‘आपण दादांचे वारस आहोत. त्यांचं रक्त आपल्या शरीरात आहे. त्यांनी जपलेला जनसेवेचा विचार पुढे नेणं हा आमचा निर्धार आहे,’ असंही ते म्हणाले.
दरम्यान, माळेगाव कारखान्याच्या आर्थिक स्थितीवरून युगेंद्र पवारांनी केलेल्या ७० कोटी रुपयांच्या नुकसानाच्या दाव्यावरही जय पवारांनी पलटवार केला. आपण माहिती घेतल्यानंतर कारखाना दोन कोटी रुपयांच्या नफ्यात असल्याचं समोर आल्याचं त्यांनी सांगितलं. ‘निवडणूक लढवा, पण वस्तुस्थितीच्या आधारावर. सभासद आणि शेतकरी सुज्ञ आहेत,’ असा इशाराही त्यांनी दिला.
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक वैयक्तिक आरोपांपेक्षा सभासदांचं हित, शेतकऱ्यांचा फायदा आणि कारखान्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर व्हावी, अशी भूमिका जय पवारांनी मांडली. अंतिम निर्णय सभासदच घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
