दिवाळीच्या तोंडावर साखरेचा गोडवा कडू होणार? दरात तब्बल २०% वाढ; शेअर्सही सुस्साट, ग्राहकांना दिलासा की खिशाला झळ?

पुणे : यंदाच्या सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या दरात तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दसरा-दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे.
साखरेच्या दरवाढीचा परिणाम केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. जागतिक बाजारातही साखरेच्या किमती वाढताना दिसत आहेत. देशांतर्गत बाजारात साखरेचे दर तब्बल १९ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत.

उत्पादन घटल्याचा मोठा परिणाम


साखरेच्या दरवाढीमागे यंदा घटलेलं उत्पादन हे प्रमुख कारण मानलं जात आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश ही प्रमुख ऊस उत्पादक राज्ये आहेत. मात्र, यंदा या राज्यांमध्ये उसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, साखरेचं उत्पादन सुमारे २८ ते २९ दशलक्ष टनांनी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या दरावर आणखी दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, साखरेच्या वाढत्या दराचा फायदा काही साखर कंपन्यांच्या शेअर्सनाही होताना दिसत आहे. अनेक भारतीय साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये ४ ते ९ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे साखरेच्या दरात आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारकडून साखरेचा अतिरिक्त वापर कमी करण्याचे प्रयत्न
साखरेच्या वाढत्या किमतींचा फटका थेट ग्राहकांना बसू नये, यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. साखरेचा अतिरिक्त वापर कमी करण्यासाठी इथेनॉल उत्पादनात साखरेच्या वापरावर निर्बंध आणण्याची योजना सरकारकडून आखली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे बाजारातील साखरेचा वापर नियंत्रित होऊन वाढत्या किमती काही प्रमाणात आटोक्यात येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ग्राहकांना याचा फटका बसू नये यासाठी सरकारने साखरेच्या साठ्यावर मर्यादाही निश्चित केली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
दसरा-दिवाळीत दर आणखी वाढणार?
आता दसरा आणि दिवाळीसारखे महत्त्वाचे सण जवळ आले आहेत. या काळात पेढे, मिठाई आणि विविध गोड पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मागणी वाढल्यास साखरेच्या दरावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यातच यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून उसाच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे साखरेचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी आणि सणासुदीच्या काळात मागणी जास्त राहिल्यास साखरेचे दर आणखी वाढू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
