बाहेरून जेवण मागवल्याचा राग अनावर; नवऱ्यानं पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य, पुण्यात खळबळ..

पुणे : पत्नीनं घरी जेवण न बनवता बाहेरून जेवण ऑर्डर केल्याचं पाहून पतीला प्रचंड राग आला. त्यानं पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. काहीच वेळात या वादानं हिंसक रूप धारण केलं अन् रागाच्या भरात पतीनं घरातील धारदार कात्री उचलून पत्नीवर सपासप वार केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली.
पतीचं हे रूप पाहून पत्नी प्रचंड घाबरली. घटनेत जखमी झालेल्या पत्नीनं पोलिसांत धाव घेत आरोपी पतीविरोधात फिर्याद दिली. पत्नीला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पतीवर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शुभम अशोक शेजवळ (वय २८, रा. सिद्धिविनायक कॉलनी, दत्तनगर चौक, आंबेगाव बुद्रुक) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय पती सोमवारी दुपारी दारूच्या नशेत घरी आला होता. यावेळी पत्नीनं घरी जेवण न बनवता, ते बाहेरून ऑर्डर केल्याचं त्याला समजलं आणि शुभमचा पारा चढला. दोघांमध्ये आधी या कारणावरून वाद झाला.


वाद विकोपाला जाताच शुभमनं स्वयंपाकघरातील कात्री उचलली आणि पत्नीवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यात पत्नीच्या दंडावर कात्रीनं वार केल्यानं ती जखमी झाली. अखेर घाबरलेल्या 26 वर्षीय पत्नीनं पोलिसात धाव घेत पतीविरोधात गुन्हा दाखल केला.
