MPSC आंदोलन गाजवणाऱ्या विवेकानंद पाटीलचं साधं घर पाहून उदय सामंत म्हणाले; संघर्षाची कल्पना येते, पण…

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आपल्या आक्रमक आणि ठसकेबाज भाषणामुळे चर्चेत आलेला कोल्हापूरचा तरुण विवेकानंद पाटील सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
दरम्यान, विवेकानंद पाटील यांच्या राधानगरी तालुक्यातील माजगाव येथील साध्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहिल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

विवेकानंद पाटील यांचे घर पत्र्याचे असून मातीच्या भिंती आहेत. त्यांचे आई-वडील शेती करतात. घरातील विविध स्पर्धांमध्ये मिळालेल्या ट्रॉफी आणि पुरस्कार पाहूनही अनेकांनी विवेकानंद यांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे.


उदय सामंतांनी शेअर केला घराचा VIDEO
मंत्री उदय सामंत यांनी विवेकानंद पाटील यांच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या पोस्टमध्ये त्यांनी विवेकानंद यांच्या घरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या फोटोचाही उल्लेख केला.
विवेकानंद पाटील यांचे घर पाहून त्यांच्या संघर्षाची कल्पना येते. मात्र, घरातील विविध पारितोषिके पाहून त्याहून अधिक समाधान मिळाले, असे उदय सामंत यांनी म्हटले. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा दाखला देत त्यांनी मेहनत, ध्यान आणि एकाग्रतेचे महत्त्व अधोरेखित केले.
‘MPSC विद्यार्थ्यांच्या पाठिशी सरकार’
उदय सामंत यांनी यावेळी MPSC विद्यार्थ्यांना महत्त्वाची ग्वाहीही दिली. MPSCच्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन सदैव उभे आहे, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, पुण्यातील MPSC आंदोलनात विविध राजकीय नेते सहभागी होत असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला जात आहे. आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह भरती आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित विविध मागण्यांचा समावेश आहे.
विश्वजित कदमांची घर बांधून देण्याची ऑफरही नाकारली
दरम्यान, काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनीही विवेकानंद पाटील यांच्या घराची परिस्थिती पाहून त्यांच्यासाठी चांगले घर बांधून देण्याची ऑफर दिली होती. मात्र, विवेकानंद पाटील यांनी ही ऑफर नम्रपणे नाकारली.
आपण तरुण असून मेहनत करण्याची क्षमता आहे, त्यामुळे आपल्या परिस्थितीचे भांडवल करायचे नाही, अशी भूमिका विवेकानंद पाटील यांनी मांडली. घर आज ना उद्या बांधता येईल; मात्र सध्या आपले करिअर आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असा त्यांचा सूर होता.
पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद पाटील यांचे भाषण आणि त्यांचा संघर्ष सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
