सगळीकडूनच महागाईचा मार! RBIचा मोठा निर्णय; होम लोन, कार लोनचा EMI वाढणार


मुंबई : वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि रुपयाच्या घसरत्या मूल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्जदारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. RBIच्या मौद्रिक धोरण समितीने (MPC) रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.25 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट आता 5.25 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांवर पोहोचला आहे.

विशेष म्हणजे, फेब्रुवारी 2023 नंतर सुमारे साडेतीन वर्षांनी RBIने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवस चाललेल्या MPC बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा करण्यात आली.

इतर दरांमध्येही बदल

रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी (SDF) दर 5.25 टक्के, तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर आणि बँक रेट 5.75 टक्के झाला आहे. मात्र, MPCने आपली भूमिका ‘तटस्थ’ ठेवली आहे.

EMI किती वाढणार?

रेपो रेट वाढीचा परिणाम प्रामुख्याने फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतलेल्या ग्राहकांवर होऊ शकतो. यामध्ये होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचा समावेश आहे. मात्र, रेपो रेट वाढला म्हणजे प्रत्येक बँकेची EMI लगेच वाढेलच असे नाही. संबंधित बँकेचा लेंडिंग रेट आणि कर्जाचा रीसेट सायकल यावर प्रत्यक्ष परिणाम अवलंबून असेल.

50 लाखांच्या होम लोनवर किती अतिरिक्त भार?

समजा, एखाद्या ग्राहकाने 50 लाख रुपयांचे गृहकर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी 8.50 टक्के व्याजदराने घेतले आहे. व्याजदर 25 बेसिस पॉईंट्सने वाढून 8.75 टक्के झाल्यास मासिक EMI 43,391 रुपयांवरून सुमारे 44,186 रुपये होऊ शकते.

म्हणजेच दरमहा जवळपास 794 रुपये अधिक मोजावे लागू शकतात. हाच व्याजदर संपूर्ण 20 वर्षे कायम राहिल्यास कर्जाच्या एकूण व्याजखर्चातही मोठी वाढ होऊ शकते.

कार आणि पर्सनल लोनही महागण्याची शक्यता

रेपो रेट वाढीचा परिणाम केवळ गृहकर्जापुरता मर्यादित राहणार नाही. फ्लोटिंग रेटवर घेतलेल्या कार आणि पर्सनल लोनच्या व्याजदरावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

उदाहरणार्थ, 20 लाख रुपयांचे 5 वर्षांचे कार लोन 10.50 टक्के व्याजदराने घेतले असल्यास आणि दर 10.75 टक्क्यांपर्यंत वाढल्यास EMI सुमारे 43,000 रुपयांवरून 43,236 रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच दरमहा सुमारे 240 ते 250 रुपयांचा अतिरिक्त भार पडू शकतो.

त्यामुळे कर्ज घेण्याचा विचार करणाऱ्या किंवा सध्या फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज फेडणाऱ्या ग्राहकांसाठी RBIचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!