मुलाला ड्युटीवर आणण्यावरून तक्रार अन् संतापाचा उद्रेक; CISF जवानाने AK-47 उचलली, १८ फैरी झाडत ४ सहकाऱ्यांचा जीव घेतला


बसोहली : मुलाला कामाच्या ठिकाणी आणण्यावरून सुरू झालेला वाद एका CISF जवानाच्या संतापाचा कारण ठरला आणि त्याचे पर्यवसान थेट रक्तरंजित गोळीबारात झाले. जम्मू-कश्मीरमधील बसोहली जिल्ह्यातील माश्का गावातील सेवा-३ जलविद्युत प्रकल्पात CISF हेड कॉन्स्टेबल अवधेश कुमार सिंह याने आपल्या सहकाऱ्यांवर AK-47 मधून गोळीबार केला. या घटनेत चार CISF कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये असिस्टंट कमांडंट अंकित कुमार पांडे, सब-इन्स्पेक्टर लक्ष्मण सिंग, कॉन्स्टेबल रफीक अहमद आणि संदीप कुमार यांचा समावेश आहे. सिंहने तब्बल १८ फैरी झाडल्याची माहिती CISF अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अवधेश कुमार सिंह आणि त्यांची पत्नी हेड कॉन्स्टेबल पूजा देवी यांची एकाच प्रकल्पस्थळी नियुक्ती होती. दोघांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ड्युटी देण्यात आली होती. शिफ्ट बदलताना लहान मुलाला एका पालकाकडून दुसऱ्याकडे सोपवण्यासाठी ते मुलाला कामाच्या ठिकाणी घेऊन येत असल्याचे तपासात समोर आले आहे.

मात्र, प्रकल्प परिसरात मुलाला आणण्यास युनिट प्रशासनाने आक्षेप घेतला होता. विशेषतः क्वार्टर गार्ड परिसरात मुलाला घेऊन येण्यास किंवा तेथे थांबण्यास परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. घटनेच्या दिवशीही मुलाला जोडीदाराकडे सोपवण्यासाठी घटनास्थळी आणण्यात आले. याबाबत कंपनी कमांडरकडे तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर वाद निर्माण झाला.

तक्रारीनंतर संताप, थेट कार्यालयात घुसून गोळीबार

सूत्रांच्या माहितीनुसार, असिस्टंट कमांडंट अंकित कुमार पांडे यांच्याकडे तक्रार झाल्याने अवधेश कुमार सिंह संतप्त झाला. त्यानंतर तो मुख्य प्रवेशद्वाराजवळील ऑपरेशन्स सेक्शनच्या कार्यालयात गेला. तेथे चार कर्मचारी उपस्थित होते. सिंहने अचानक त्यांच्यावर AK-47 मधून गोळीबार सुरू केला.

गोळीबारात चारही कर्मचारी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर इतर CISF जवानांनी तत्काळ अवधेश कुमार सिंहला ताब्यात घेत अटक केली.

१५० काडतुसे आणि सर्व्हिस रायफल जप्त

CISFच्या माहितीनुसार, अवधेश कुमार सिंहकडे १५० काडतुसे होती. गोळीबारासाठी वापरण्यात आलेले त्याचे सर्व्हिस वेपनही जप्त करण्यात आले आहे. जखमी चारही जवानांना उपचारासाठी हिमाचल प्रदेशातील NHPC रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर जलविद्युत प्रकल्प परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या गोळीबारामागील नेमकी कारणे आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!