राजकीय घडामोडींना वेग; फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवारांची आज महत्त्वाची बैठक


मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांच्यात आज महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत विधान परिषदेच्या पाच जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर हे पदवीधर मतदारसंघ, तर अमरावती आणि पुणे हे शिक्षक मतदारसंघ आहेत. कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार, याबाबत महायुतीत चर्चा सुरू आहे.

यापूर्वी झालेल्या समन्वय बैठकीत या जागांबाबत प्राथमिक चर्चा झाली. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जागावाटपाबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या दोन जागांवरून पेच

पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक अशा विधान परिषदेच्या दोन जागा असल्याने या दोन्ही जागांवर महायुतीतील घटक पक्षांकडून दावेदारी केली जात आहे. विशेषतः पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची तयारी सुरू आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठीही शिवसेना शिंदे गटाकडून दावा करण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर हे या मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केल्याचे वृत्त आहे.

भाऊसाहेब आंधळकर यांनी यापूर्वी शिवसेनेकडून बार्शी विधानसभा निवडणूक लढवली होती. आता पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघात आपण संघटनात्मक बांधणी केली असल्याने पक्षाने आपला विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजपचाही दोन्ही जागांवर दावा

दरम्यान, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक या दोन्ही जागांवर भाजपचा दावा असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही जागा पारंपरिकरित्या भाजपकडे राहिल्या असल्याचा दावा त्यांनी केला असून, महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या चर्चेनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या जागांबाबत महायुतीतील जागावाटपाकडे आता लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!