सचिन वाझेंना मोठा दिलासा! मनसुख हिरेन हत्या अन् अँटिलिया प्रकरणात अटी-शर्तींसह जामीन मंजूर

पुणे : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए विशेष न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. १३ मार्च २०२१ पासून तुरुंगात असलेल्या वाझेंना साडेपाच वर्षांहून अधिक काळ कोठडीत राहिल्यानंतर हा दिलासा मिळाला आहे.
जामीन मंजूर करताना न्यायालयाने विविध अटी घातल्या आहेत. वाझेंकडे पासपोर्ट असल्यास तो तात्काळ एनआयएकडे जमा करावा लागणार आहे. तसेच या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष पूर्ण होईपर्यंत वाझेंना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रवेश करण्यास किंवा वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मात्र, सुनावणीच्या दिवशी न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी त्यांना या जिल्ह्यांमध्ये येण्याची परवानगी असेल. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना तात्काळ निर्धारित ठिकाणी परतावे लागणार आहे.


जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने आरोपपत्रातील विविध पुरावे, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आलेले आरोप आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील परिस्थितीजन्य पुराव्यांचा विचार केला. या प्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वी मिळालेला जामीन हेदेखील न्यायालयाने विचारात घेतले.
न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रथमदर्शनी आरोप निश्चित होणे आणि जामीन नाकारणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. त्यामुळे केवळ आरोपांच्या आधारे दीर्घकाळ जामीन नाकारता येणार नाही, असा विचार न्यायालयाच्या निर्णयात दिसून येतो.
या प्रकरणात एनआयएने १४ हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, त्यामध्ये सुमारे ३२० साक्षीदारांचा समावेश आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर करण्यात आले आहेत.
प्रकरणाची सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आणि वाझे यांनी आतापर्यंत कोठडीत घालवलेला कालावधी लक्षात घेऊन एनआयए विशेष न्यायालयाने त्यांना अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला.
