शेरीचीवाडीत चुलत सासू-सुनेची हत्या; घराच्या ओसरीवर झोपलेल्या दोघींवर हल्ला, बारामतीत खळबळ..


बारामती : बारामती तालुक्यातील बाबुर्डी अंतर्गत शेरीचीवाडी येथे चुलत सासू-सुनेची हत्या झाल्याची धक्कादायक समोर आली आहे. ही घटना मंगळवारी ता. २९) सकाळी उघडकीस आली. घराच्या ओसरीवर झोपलेल्या दोन्ही ज्येष्ठ महिलांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. एकाच वेळी दोन महिलांची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

इंदुमती मारुती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ६५) अशी मृत महिलांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता २८) सायंकाळी घराशेजारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर कुटुंबीय घरी गेले आणि झोपी गेले.

मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घराच्या ओसरीवर झोपलेल्या इंदुमती आणि कृष्णाबाई यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली.

मंगळवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास ही घटना आली. इंदुमती लडकत यांचा मुलगा गणेश मारुती लडकत हे बारामती पंचायत समितीअंतर्गत ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, पोलिसांची फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली असून, घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. तसेच ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी तपासणी करून हल्लेखोराचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या दुहेरी हत्याकांडाचा तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!