एमपीएससीचा मोठा निर्णय! राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलली; नवीन तारीख कधी जाहीर होणार?

मुंबई : स्पर्धा परीक्षांच्या आयोजनावरून राज्यात सध्या चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३ ऑक्टोबर २०२६ पासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सुधारित वेळापत्रकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एमपीएससीच्या विविध परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि मूल्यांकनातील त्रुटींवरून विद्यार्थी संघटनांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची मागणीही विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.

कोणत्या परीक्षा पुढे ढकलल्या?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा २०२६ या तीन परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा ३ ऑक्टोबर २०२६ पासून नियोजित होत्या. विद्यार्थी संघटना, पालक आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्यांचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे.


उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णय
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाबाबत अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांचा विचार करून आयोगाने उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीही लवकरच अपेक्षित आहेत.
परीक्षांच्या नव्या तारखा कधी जाहीर होणार?
तीनही मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला, तरी आयोगाने अद्याप परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केलेल्या नाहीत. या परीक्षांचे नवीन वेळापत्रक लवकरच स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नवीन तारखा कधी जाहीर होतात, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
