पत्नीचे प्रियकरासोबत अनैतिक संबंध; पतीचा काटा काढण्यासाठी रचला कट, १६ वर्षीय मुलालाही केलं सामील; १८० सीसीटीव्ही फुटेजमधून अखेर हत्येचा उलगडा

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये अनैतिक संबंधातून पतीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने प्रियकर आणि त्याच्या मित्रासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी महिलेने आपल्या १६ वर्षीय मुलाचीही मदत घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मोहनलालगंज परिसरातील या प्रकरणाचा पोलिसांनी तब्बल १८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून छडा लावला.
मृत राम किशोर वाल्मीकी हा मजुरीचे काम करत होता. आरोपी महिला आणि राम किशोर यांच्यात सुमारे चार वर्षांपासून संबंध होते. दोन वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केले होते. मात्र, राम किशोरला पत्नीचे मुन्ना उर्फ मुच्छड याच्यासोबत संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात वाद सुरू झाले. दरम्यान, राम किशोरने पहिली पत्नी कविता देवीकडे पुन्हा जाणे आणि तिला आर्थिक मदत करणे सुरू केले होते. याला त्याच्या दुसऱ्या पत्नीचा विरोध होता.

राम किशोर बेपत्ता झाल्यानंतर त्याची पहिली पत्नी कविता देवीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तिने पतीच्या हत्येचा संशय व्यक्त करत दुसऱ्या पत्नीवर आरोप केले. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर प्रकरणातील धक्कादायक बाबी समोर आल्या.


पोलिसांच्या तपासानुसार, १४ आणि १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री महिलेने तिचा प्रियकर मुन्ना आणि त्याचा मित्र मोहम्मद इक्बाल उर्फ वसीर अहमद यांना घरी बोलावले. घराचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. दोघांनी घरात प्रवेश करून झोपलेल्या राम किशोरवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.
हत्येनंतर घरातील जमिनीवर पडलेले रक्ताचे डाग झाकण्यासाठी प्लास्टरचा वापर करण्यात आला. त्यानंतर महिलेने आपल्या पहिल्या पतीपासून असलेल्या १६ वर्षीय मुलाला बोलावले. आई आणि मुलाने मिळून मृतदेह एका लाकडी पेटीत ठेवला आणि ती पेटी पलंगाखाली लपवली. हत्येत वापरल्याचा संशय असलेला चाकू आणि रक्ताचे डाग असलेली झाडूही घरात लपवण्यात आली.
यानंतर आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ई-रिक्षाचा वापर केला. घरापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कालव्याच्या पुलाखाली मृतदेह फेकण्यात आला. याच परिसरात काही दिवसांपूर्वी पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. तपासात तो राम किशोर यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी स्थानिक गुप्तचर यंत्रणेची मदत घेतली. मृतदेह नेण्यासाठी वापरलेल्या ई-रिक्षाचा मार्ग शोधताना तब्बल १८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. या तपासातून पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. पोलिसांनी हत्येतील शस्त्र आणि मृतदेह वाहून नेण्यासाठी वापरलेली ई-रिक्षाही जप्त केली.
या प्रकरणात मुन्ना उर्फ मुच्छड (५२), मोहम्मद इक्बाल उर्फ वसीर अहमद (४०) आणि राम किशोरची पत्नी यांना अटक करण्यात आली आहे. तिघांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर १६ वर्षीय मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले असून त्याला सुधारगृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.