‘माहेरून 5 लाख घेऊन ये’चा तगादा; ‘तुला कामही जमत नाही’ म्हणत टोमणे… लग्नाच्या 6 महिन्यांतच 26 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी अंत


सोलापूर : लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच एका 26 वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोलापुरात घडली आहे. सादिया अहमद काजी असे मृत विवाहितेचे नाव आहे. व्यवसायात नुकसान झाल्याचे सांगत माहेरून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. याशिवाय घरकाम आणि स्वयंपाक येत नसल्याचे सांगून अपमानास्पद टोमणे, शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

सादिया यांचा विवाह 27 मार्च 2026 रोजी सोलापूर येथील केकडे नगर, सिद्धेश्वर कॉम्प्लेक्ससमोर, मुळेगाव रोड परिसरातील अहमद काजी यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्या सासरी राहत होत्या. मात्र, लग्नानंतर काही काळातच सासरच्या मंडळींकडून त्यांना कथित त्रास सुरू झाल्याचे त्यांच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

फिर्यादी फारुख कासिम जमादार (वय 46, रा. जक्केकुर, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांच्या आरोपानुसार, पती अहमद काजी, सासू सबीया काजी आणि सासरे शकील काजी हे सादिया यांना वारंवार टोमणे मारत होते. “तू हेंद्री आहेस, मंदबुद्धी आहेस, तुला घरातील कामे आणि स्वयंपाक जमत नाही,” अशा शब्दांत त्यांना अपमानित केले जात होते. बसता-उठता टोमणे मारण्यासोबतच शिवीगाळ आणि मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याच काळात व्यवसायात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी सादियाकडे केली जात होती, असा आरोप आहे. या आर्थिक मागणीमुळे तिच्यावर दबाव वाढत होता. एकीकडे पैशांसाठी तगादा आणि दुसरीकडे सततची कथित अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ व मारहाण यामुळे ती त्रस्त झाली होती, असे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

अखेर या कथित जाचाला कंटाळून सादियाने 17 सप्टेंबर 2026 रोजी रात्री उशिरा राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली.

या प्रकरणी फारुख जमादार यांच्या फिर्यादीवरून पती अहमद काजी, सासरे शकील काजी आणि सासू सबीया काजी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या मंडळींकडून विवाहितेला नेमका कोणत्या प्रकारे त्रास दिला गेला, आर्थिक मागणी करण्यात आली होती का आणि या आरोपांमागील वस्तुस्थिती काय आहे, याचा तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने सादियाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!