‘मी तन्हा खातून’; पुण्यात तरुणीनं पोलिसांनाच गंडवलं, घराची झडती घेताच समोर आलं धक्कादायक सत्य..

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. देहूरोड परिसरात बनावट ओळख आणि कागदपत्रांच्या आधारे राहत असलेल्या २४ ते २५ वर्षीय तरुणीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री सापळा रचून ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता ती बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले.
तन्हा खातून ते फिहा रहमान; बनावट कागदपत्रांचा पर्दाफाश
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ATSच्या पथकाने देहूरोड परिसरात कारवाई केली. चौकशीदरम्यान तरुणीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आपले नाव ‘तन्हा खातून’ असल्याचे सांगितले.

मात्र, तिच्याकडील कागदपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर चौकशीत तिने आपले खरे नाव फिहा मो. मुजिबूर रहमान असून, ती बोयरा, जमालपूर, बांगलादेश येथील रहिवासी असल्याची माहिती दिली.


WhatsAppवरून आई-वडिलांच्या संपर्कात
अधिक चौकशीत तरुणीने सुमारे वर्षभरापूर्वी बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केल्याची माहिती पोलिसांना दिली. भारतात वास्तव्यास असताना ती बांगलादेशातील आई-वडिलांशी WhatsAppच्या माध्यमातून संपर्कात होती. सध्या तिला बांगलादेशात माघारी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.
२०२५ पासून २९ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेकायदेशीर घुसखोरीविरोधात मोहीम सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २०२५ पासून आतापर्यंत २९ बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.