डॉ. रत्नाकर महाजन यांच्या स्मृतींना उजाळा; इंदापूरमध्ये श्रद्धांजली सभा, मान्यवरांनी व्यक्त केल्या सहवेदना

इंदापूर : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, काँग्रेसचे प्रवक्ते आणि संघर्षशील लेखक डॉ. रत्नाकर महाजन यांच्या निधनाने इंदापूरच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा भावना इंदापूर तालुका व शहरातील मान्यवरांनी व्यक्त केल्या.
डॉ. महाजन यांचे ११ सप्टेंबर रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी इंदापूरकरांच्या वतीने बुधवारी (१६ सप्टेंबर) सिद्धेश्वर मंदिर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत डॉ. महाजन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, इंदापूर तालुका व शहरातील अनेकांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. इंदापूर शहर व तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डॉ. महाजन यांच्या प्रतिमेस त्यांच्या कन्या प्रियांका विश्वेश्वर कोन्नूर-महाजन, जावई विश्वेश्वर कोन्नूर आणि नात रेवा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
इंदापूरच्या भूमीत शालेय शिक्षण घेतलेल्या डॉ. महाजन यांनी पुढे दिल्लीपासून महाराष्ट्राच्या विविध भागांपर्यंत तसेच देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. सामाजिक चळवळी, राजकारण, लेखन आणि वैचारिक क्षेत्रात त्यांनी सातत्याने भूमिका मांडली. त्यांच्या कार्याचा तसेच इंदापूरशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उपस्थितांनी आपल्या मनोगतातून आवर्जून उल्लेख केला.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून भावना व्यक्त करून डॉ. महाजन यांना श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ लेखिका प्रतिभाताई गारटकर यांनी पाठविलेला शोकसंदेश राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे यांनी वाचून दाखविला.
नगराध्यक्ष भरत शहा, भूविकास बँकेचे माजी संचालक राजेंद्र तांबिले, निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. कृष्णाजी यादव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, ॲड. विजय आजोतीकर, माजी प्राचार्य अरविंद गारटकर, माजी सभापती दत्तात्रय शेंडे, शहर नागरिक संघर्ष समितीचे प्रा. कृष्णा ताटे, भाजप शहराध्यक्ष किरण गानबोटे, निरा-भिमा कारखान्याचे संचालक उमेश पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, पत्रकार प्रा. नागनाथ शिंगाडे, माजी गटनेते कैलास कदम, आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष संदीपान कडवळे, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक भास्कर गुरगुडे, राष्ट्रसेवा दलाचे गफूर सय्यद, भटक्या-विमुक्त संघटनेचे तानाजी धोत्रे, तालुका काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास शेळके, रामराव पाडुळे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी पुष्पराज जमदाडे, तय्यबभाई शेख आदींनी डॉ. महाजन यांच्या आठवणींना उजाळा देत सहवेदना व्यक्त केल्या.
आणीबाणीच्या काळातील राजघाटावरील निषेधाचा प्रसंग चर्चेत
यावेळी राजेंद्र तांबिले यांनी डॉ. महाजन यांच्या संघर्षमय प्रवासातील विविध प्रसंगांना उजाळा दिला. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवत विविध आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता. आणीबाणीच्या काळातील २ ऑक्टोबर १९७५ रोजीचा राजघाटावरील त्यांच्या निषेधाचा प्रसंग विशेष चर्चेत आला.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी आल्या असताना डॉ. महाजन यांनी झाडीतून बाहेर येत ‘आणीबाणी मुर्दाबाद’च्या घोषणा देऊन निषेध नोंदविल्याचा उल्लेख राजेंद्र तांबिले यांनी केला.
राजकीय अभ्यासासाठी ‘रेडी रेकनर’ अशी ओळख
महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींचे सखोल अभ्यासक म्हणून डॉ. महाजन यांची ओळख होती. राजकीय अभ्यासासाठी त्यांना ‘रेडी रेकनर’ मानले जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
शरद पवार, संभाजीराव काकडे, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, भाई वैद्य, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यासह देशातील अनेक नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते. धर्मनिरपेक्ष विचारांना बळ देण्यासाठी त्यांनी जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.
नियोजन मंडळाच्या कार्याध्यक्षपदी सुमारे दहा वर्षे काम
कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या कार्याध्यक्षपदी डॉ. महाजन यांनी सुमारे दहा वर्षे काम केले. त्यांच्या कार्यकाळात प्रसिद्ध झालेला ‘मानव विकास अहवाल’ देशभरात चर्चेत आला. राज्याच्या तसेच इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचाही यावेळी उल्लेख करण्यात आला.
सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रात डॉ. रत्नाकर महाजन यांनी निर्माण केलेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या श्रद्धांजली सभेचे आयोजन हमीद आत्तार, महादेव चव्हाण, हनुमंत बोंगाणे, विनायक लोंढे, बाळासाहेब क्षीरसागर, गजानन पवार आणि दादा जाधव यांनी केले.