लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर! 1500 रुपयांच्या हप्त्याची तारीख आली समोर; कधी जमा होणार पैसे?

पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गणेशोत्सवानंतर म्हणजेच 25 सप्टेंबरनंतर पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
तांत्रिक कारणांमुळे हप्ता लांबणीवर
गौरी-गणपतीच्या सणाचे औचित्य साधून ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल, असा अंदाज यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे हप्ता वितरणाला विलंब झाला.

आता महिला व बाल विकास विभागाकडून निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे थेट पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा केले जाणार आहेत.


अनंत चतुर्दशीनंतर पैसे जमा होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीनंतर पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. हा निधी सर्व महिलांच्या खात्यात एकाच वेळी जमा न करता टप्प्याटप्प्याने वर्ग केला जाण्याची शक्यता आहे.
याआधी जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टमध्ये देण्यात आला होता. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 1 कोटी 66 लाख पात्र महिलांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. सणासुदीच्या काळात मिळणारी ही रक्कम महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, हप्ता जमा होण्याची अधिकृत तारीख शासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांनी सोशल मीडियावरील किंवा इतर माध्यमांमधील अपुऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे.
अर्जातील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू
दरम्यान, या योजनेतील अनेक महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे, कागदपत्रांमधील त्रुटींमुळे किंवा बँक खात्याशी संबंधित अडचणींमुळे प्रलंबित किंवा नामंजूर झाले आहेत. काही लाभार्थी महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा होण्यातही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
या त्रुटी दूर करून पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित विभागाकडून आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.