गणेशोत्सवात एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! NCMC कार्डची सक्ती थेट 30 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर; कार्ड नसले तरी मिळणार सवलतीचं तिकीट

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या अंमलबजावणीला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. एनसीएमसी कार्डची सक्तीची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एनसीएमसी कार्डची व्यवस्था सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी प्रवाशांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. कार्ड काढण्यासाठी रांगा, सर्व्हर डाऊन होणे, कार्ड सक्रिय न होणे, कार्ड रीड न होणे तसेच रिचार्ज करताना अडथळे येत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे कार्डची सक्ती करण्यापूर्वीच व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती.

यापूर्वी तांत्रिक कारणांमुळे एनसीएमसी कार्डवरून सवलतीचे तिकीट काढता न आल्यास 14 सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकिटावर सवलत देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र समस्या कायम असल्याने ही मुदत आता आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत कार्ड नसले तरी पात्र प्रवाशांना मॅन्युअल तिकिटावर पूर्वीप्रमाणे सवलत मिळणार आहे.


विशेष म्हणजे, ज्या प्रवाशांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली आहे, मात्र अद्याप कार्ड मिळालेले नाही, त्यांनाही चिंता करण्याची गरज नाही. नोंदणीची पावती दाखवल्यास 30 सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकिटावर सवलत घेता येणार आहे. त्यामुळे कार्ड वितरणाला विलंब झाल्यामुळे प्रवाशांचे नुकसान होणार नाही.
दरम्यान, एनसीएमसी कार्डच्या रिचार्ज व्यवस्थेवरूनही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्रामीण भागातील अनेक गावांपासून एसटी आगार किंवा तालुक्याचे ठिकाण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत केवळ कार्ड रिचार्ज करण्यासाठी प्रवाशांनी तालुक्याच्या ठिकाणी जाणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वाहकांकडे रिचार्जची सुविधा द्यावी किंवा ग्रामपंचायत स्तरावर रिचार्जची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
जोपर्यंत रिचार्ज आणि कार्ड प्रणाली पूर्णपणे सुरळीत होत नाही, तोपर्यंत सवलतीसाठी आधार कार्डचा पर्याय कायम ठेवावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे. दुसरीकडे, एनसीएमसी प्रणालीची अंमलबजावणी करताना वाहकांना पुरेसे प्रशिक्षण देण्यात आले नसल्याची तक्रारही काही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दिवसभर कार्ड टॉपअप करताना एरर येणे, मशीन हँग होणे आणि कार्ड रीड न होणे अशा समस्यांमुळे वाहकांनाही प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे सध्या 30 सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकिटावर सवलतीची मुभा देण्यात आल्याने गणेशोत्सवाच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र त्यानंतर एनसीएमसी कार्डची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते आणि तांत्रिक अडचणी कितपत दूर होतात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.