धनुष्यबाण गोठणार की शिंदेंकडेच राहणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी


मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या दाव्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून यापूर्वीच युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आहे. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळणार नसेल, तर ते गोठवण्यात यावे, असा युक्तिवाद ठाकरे गटाने गेल्या महिन्यात केला होता.

त्यानंतर ऑगस्टच्या अखेरीस शिंदे गटाकडून युक्तिवादाला सुरुवात झाली. आजच्या सुनावणीत शिंदे गटाकडून कोणते मुद्दे मांडले जातात आणि ठाकरे गटाच्या युक्तिवादाला काय उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या मालकीवरून गेल्या चार वर्षांत मोठा राजकीय आणि कायदेशीर संघर्ष पाहायला मिळाला आहे. आता सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीदरम्यान शिंदे गटाकडून आपली बाजू मांडली जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची बाजू ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल मांडत आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील दाव्याबाबत आज शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे.

यापूर्वी उद्धव ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. तसेच विधिमंडळातील पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष यांच्यातील फरकाबाबतही भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. आजच्या सुनावणीत शिंदे गट या मुद्द्यांना कशाप्रकारे उत्तर देतो आणि कोणत्या न्यायालयीन निकालांचा आधार घेतो, याकडे लक्ष लागले आहे.

यापूर्वीच्या सुनावणीत काय घडलं?

उद्धव ठाकरे गटाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली होती. केवळ आमदारांच्या बहुमताच्या आधारे राजकीय पक्षाची मालकी ठरवता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. पक्षाची संघटनात्मक रचना आणि मूळ पक्षघटना या बाबी अधिक महत्त्वाच्या असल्याचे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे मूळ राजकीय पक्षातील फूट ठरू शकत नाही, असाही युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला. यासाठी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक स्पष्ट करताना काही न्यायालयीन निकालांचाही दाखला देण्यात आला.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षाच्या रचनेत अचानक बदल करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. 2013 मध्ये पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्यात आले, तर 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आला. हे बदल लोकशाही प्रक्रियेला धरून नव्हते, असा युक्तिवाद करण्यात आला.

तसेच पक्षातील विविध पदांसाठी निवडणुका घेण्यात आल्या नाहीत आणि पक्षाचे कामकाज एकाधिकारशाही पद्धतीने सुरू असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला.

दुसरीकडे, केंद्रीय निवडणूक आयोगाला राजकीय पक्षाची घटना, पक्षाची संघटनात्मक रचना आणि विधिमंडळ पक्षाशी संबंधित बाबींचा विचार करून निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान करण्यात आला होता.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत शिंदे गटाकडून मांडण्यात येणाऱ्या युक्तिवादाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!