विठ्ठल-रुक्मिणी भक्तांसाठी मोठी बातमी! 3 दिवस मूळ दर्शन बंद राहणार; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

पंढरपूर : पंढरीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तीचे मूळ दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे. मूर्तींच्या दीर्घकालीन जतन आणि संवर्धनासाठी संरक्षक आवरण (लेप) लावण्याचे काम या कालावधीत करण्यात येणार आहे.
मूर्तींच्या संवर्धनाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांनी मंदिर समितीला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे.

यासंदर्भात 13 सप्टेंबर रोजी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे सल्लागार आणि परिषद सदस्यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक झाली. यापूर्वी 1988, 2005, 2012 आणि 2020 मध्ये मूर्तींवर संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. शेवटच्या संवर्धन प्रक्रियेला पाच वर्षे पूर्ण झाल्याने नियमित देखभालीचा भाग म्हणून पुन्हा हे काम हाती घेण्यात आले आहे.


मूर्तींचे जतन आणि संवर्धन ही मंदिर समितीची प्राथमिक जबाबदारी आहे. या प्रक्रियेदरम्यान मूर्तींचे प्राचीन स्वरूप, धार्मिक परंपरा आणि भाविकांच्या श्रद्धेचा पूर्ण आदर राखला जाणार आहे. तसेच संपूर्ण कामकाज पारदर्शक पद्धतीने केले जाईल, असा विश्वास सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केला.
पुणे पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे तांत्रिक काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान मूर्तीचे मूळ दर्शन बंद राहणार असून, या कालावधीत भाविकांनी मंदिर समितीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.