मैत्रिणीसाठी सोन्याचे दागिने मोडले, ८ लाख दिले; झटपट श्रीमंत होण्याच्या नादात सगळंच गमावलं, पुण्यातील ज्येष्ठ महिला हादरल्या


पुणे : शेअर बाजारात कमी वेळेत मोठा परतावा मिळवण्याच्या आणि ‘झटपट श्रीमंत’ होण्याच्या आमिषाला बळी पडल्याने पुण्यात एका ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल ८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मैत्रिणीवर विश्वास ठेवून तिला आर्थिक मदत करण्यासाठी या महिलेने स्वतःचे सोन्याचे दागिने मोडून पैसे उभे केले होते. मात्र, काही वेळातच हे पैसे सायबर चोरट्यांच्या हवाली झाले.

या प्रकरणी वारजे माळवाडी परिसरातील अतुलनगर येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय पीडित महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (IT Act) गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावरील जाहिरातीमधून फसवणुकीला सुरुवात

९ सप्टेंबर रोजी या फसवणुकीला सुरुवात झाली. तक्रारदार महिलेच्या मैत्रिणीने सोशल मीडियावर शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचा दावा करणारी जाहिरात पाहिली. जाहिरातीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर सायबर चोरट्यांनी तिला एका बनावट मोबाईल ॲपची लिंक पाठवली आणि ते ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

सुरुवातीला या ॲपमध्ये काही रक्कम गुंतवल्यानंतर ॲपवर मोठा परतावा मिळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे मैत्रिणीचा सायबर भामट्यांवर विश्वास बसला आणि तिने आणखी पैसे गुंतवण्यास सुरुवात केली.

मैत्रिणीसाठी दागिने मोडले, ८ लाख रुपये ट्रान्सफर

अधिक पैसे गुंतवण्यासाठी रक्कम कमी पडत असल्याने मैत्रिणीने ६५ वर्षीय महिलेकडे आर्थिक मदत मागितली. मैत्रिणीवर विश्वास असल्याने या ज्येष्ठ महिलेने कोणताही संशय न घेता सराफी पेढीत जाऊन स्वतःचे सोन्याचे दागिने मोडले आणि ९ लाख रुपये उभे केले.

यातील ८ लाख रुपये त्यांनी सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या पद्धतीने ऑनलाइन ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर बनावट ॲपवर तब्बल ७४ लाख रुपयांचा परतावा जमा झाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे आपल्याला मोठा नफा झाल्याचे दोन्ही महिलांना वाटले.

पैसे काढण्याची वेळ आली अन् भामट्यांचा खरा रंग समोर आला

ॲपवर मोठी रक्कम दिसत असल्याने महिलांनी आपली गुंतवणूक आणि मिळालेला नफा बँक खात्यात काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्यांनी वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे दोन्ही महिलांच्या लक्षात आले. मैत्रिणीवर विश्वास ठेवून उभे केलेले लाखो रुपये गमावल्याने ६५ वर्षीय महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली.

अखेर दोन्ही महिलांनी वारजे माळवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!