सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे अल्पशा आजाराने निधन…

लोणी काळभोर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्राहक संरक्षण समितीच्या माजी सरचिटणीस व महिला उपाध्यक्षा स्मिता विजय नॉर्टन (वय ५२, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांचे शुक्रवारी (ता. ११) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कदमवाकवस्ती, लोणी काळभोर परिसरासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
स्मिता नॉर्टन या लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या दक्षता समितीच्या सदस्या म्हणूनही कार्यरत होत्या. या माध्यमातून त्यांनी परिसरातील अनेक महिलांच्या कौटुंबिक व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील राहिल्या. त्यामुळे परिसरात त्या आपुलकीने ‘नॉर्टन ताई’ म्हणून परिचित होत्या.

गोरगरीब, वंचित आणि तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली. विविध सामाजिक चळवळी व आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. विशेषतः महिलांच्या अडचणी, अन्याय आणि कौटुंबिक प्रश्नांवर त्या ठामपणे भूमिका मांडत. सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना त्यांनी मदतीचा हात दिला.


संवेदनशीलता, धडाडी आणि अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची वृत्ती यामुळे सामाजिक क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे परिसरातील सामाजिक कार्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, मागील चार दिवसांपासून त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फातिमानगर येथील इंडियन ख्रिश्चन सिमेट्री येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.