पुण्यात पोलिसाचाच संतापजनक कारनामा! दारूच्या नशेत पोलिसाचं तरुणीसोबत धक्कादायक कृत्य, चतुःशृंगी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारी धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. मद्याच्या नशेत एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदाराला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित हवालदाराला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. बबन अशोक वाघ असे अटक करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे

गैरहजर राहून मद्यधुंद अवस्थेत धक्कादायक कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार बबन वाघ हा १७ जुलै २०२६ पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कर्तव्यावरून बेकायदेशीरपणे गैरहजर राहत होता.


यानंतर ४ सप्टेंबर रोजी दारूच्या नशेत धुंद असलेल्या वाघ याने एका तरुणीशी अश्लील चाळे करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीने तात्काळ चतुःशृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
तक्रारीनंतर पोलिसांची तातडीने कारवाई
तरुणीच्या तक्रारीची दखल घेत चतुःशृंगी पोलिसांनी हवालदार बबन वाघ याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
या घटनेचा सविस्तर अहवाल शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीषकुमार दिघावकर यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी वाघ याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले.
मद्यधुंद अवस्थेत तरुणीशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्याने या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास चतुःशृंगी पोलीस करत आहेत.