मराठी चित्रपटसृष्टीसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! आधुनिक फिल्म सिटी उभारणार, चित्रपटगृहांची संख्याही वाढणार

मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटसृष्टीची कलात्मक गुणवत्ता जपत आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी चित्रनगरी विकसित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच विविध प्रकारचे सेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तसंच मराठी चित्रपटांना अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, हा आराखडा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्यासह ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हेलन खान, अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, किरण शांताराम तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.


मराठी चित्रपटसृष्टीच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
कलात्मकदृष्ट्या देशातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांचा समावेश होतो, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठी चित्रपटसृष्टीच्या योगदानाचे कौतुक केले. आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील सर्वोत्तम रंगभूमी म्हणून मराठी रंगभूमीकडे पाहिले जाते. मराठी कलावंतांनी रंगभूमीची परंपरा आणि प्रतिष्ठा आजही कायम ठेवली आहे. याच समृद्ध परंपरेच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टी सातत्याने नवनवीन उंची गाठत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दिग्गज कलावंतांचा पुरस्काराने गौरव
या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच ज्येष्ठ लेखक आणि पटकथाकार सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. सलीम खान यांच्या वतीने अभिनेत्री हेलन यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला.
हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतसेवेचा गौरव
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीत अखंड संगीतसेवा करत स्वतंत्र संगीतविश्व निर्माण केले. ज्ञानेश्वर माऊली, वीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील त्यांच्या संगीतनिर्मितीतून मराठी संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रभावना प्रभावीपणे व्यक्त झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
‘मोगरा फुलला’, ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’, ‘रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा’ तसेच ‘शिवकल्याण राजा’ यांसारख्या अजरामर रचनांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या योगदानाचा गौरव केला.
सलीम खान यांच्या योगदानाचाही गौरव
सलीम-जावेद या जोडीने आणि सलीम खान यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवे वळण दिले. ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रभावी नायक आणि अजरामर व्यक्तिरेखा निर्माण केल्या.
भारतीय चित्रपटांमध्ये ‘अँग्री यंग मॅन’ ही संकल्पना लोकप्रिय करण्यात सलीम खान यांच्या लेखनाचा मोठा वाटा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. त्यांच्या लेखनाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या कथाकथनाच्या पद्धतीवर मोठा प्रभाव टाकल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज चित्रनगरी उभारण्यासोबतच मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या नियोजनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला आगामी काळात आणखी मोठे व्यासपीठ मिळण्याची शक्यता आहे.