साखरेचा भाव 75 रुपयांवर, दिवाळीआधी सरकारचा मोठा डाव! 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू; शेतकरी-कारखानदारांची मात्र नाराजी

मुंबई : सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढलेल्या दराने सर्वसामान्यांच्या खिशाला झटका बसत असतानाच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. साखरेचा पुरवठा वाढवून आगामी सणांमध्ये दर नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
मागील हंगामात साखरेचे उत्पादन घटल्याने बाजारात पुरवठ्याचा ताण निर्माण झाला. त्याचा परिणाम म्हणून ऑगस्टमध्ये काही ठिकाणी साखरेचा किरकोळ दर तब्बल 70 ते 75 रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. आता गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी असे सलग सण असल्याने साखरेची मागणी वाढणार आहे. मिठाई, फराळ आणि घरगुती वापरासाठी मागणी वाढल्यास दर आणखी चढण्याची शक्यता आहे.

ही परिस्थिती टाळण्यासाठी यंदा नेहमीच्या वेळेपेक्षा जवळपास महिनाभर आधी गाळप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार आणि साखर कारखाना संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


साधारणपणे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. मात्र यंदा 15 ऑक्टोबरपासूनच कारखाने सुरू करण्याची तयारी आहे. महाराष्ट्र देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्य असल्याने बाजारातील पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्राकडूनही आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना झाल्याचे सांगितले जात आहे.
मात्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि कारखानदारांची चिंता वाढली आहे. नोव्हेंबरपूर्वी गाळप सुरू केल्यास ऊसतोडणी, वाहतूक आणि कारखान्यांच्या खर्चावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने कारखानदारांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
त्यामुळे आता एकीकडे साखरेचा भाव आटोक्यात आणण्याचे सरकारचे लक्ष्य, तर दुसरीकडे शेतकरी आणि कारखानदारांचा विरोध, अशा दुहेरी कोंडीत यंदाचा साखर हंगाम सुरू होणार आहे. दिवाळीपूर्वी सरकारचा हा निर्णय साखरेच्या बाजाराला किती दिलासा देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.