मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांसाठी मोठी गुड न्यूज! मृतांच्या वारसाला MIDCमध्ये नोकरी; सरकारकडून प्रक्रिया सुरू


मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनात जीव गमावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या प्रत्येक आंदोलकाच्या कुटुंबातील एका पात्र सदस्याला एमआयडीसीमध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला असून, आता प्रत्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया पुढे सरकली आहे.

या निर्णयानुसार संबंधित मृत आंदोलकांच्या वारसांची पात्रता तपासण्याचं काम जिल्हाधिकारी कार्यालयांकडून करण्यात आलं आहे. प्राथमिक कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र वारसांची यादीही तयार करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात प्रशासनाने संबंधित कुटुंबीयांची कागदपत्रे तपासून घेतली असून, नोकरी देण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलनात प्राण गमावलेल्या कुटुंबांना रोजगाराचा आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरूच आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस असून, मराठ्यांना कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी जात प्रमाणपत्र मिळावं, ही प्रमुख मागणी आहे. उपोषणादरम्यान अन्न-पाण्याचा त्याग केल्याने जरांगे यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. मराठा समाजाच्या इतर विविध मागण्यांसाठीही त्यांचं आंदोलन सुरू आहे.

कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर सरकारची बैठक

जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीची महत्त्वाची बैठकही सुरू आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून, मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांची उपस्थिती आहे. विशेषतः मराठवाड्यातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेवर बैठकीत चर्चा केली जात आहे.

या बैठकीत मराठवाड्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले आहेत. त्यामुळे कुणबी नोंदी तपासणे, पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देणे आणि त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया याबाबत सरकारकडून कोणती दिशा दिली जाते, याकडे लक्ष लागलं आहे.

लातूर-बार्शी मार्गावर आंदोलकांचा रास्ता रोको

दुसरीकडे, जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील बोरगाव काळे येथे मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलकांनी लातूर-बार्शी मार्ग रोखल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतुकीचा खोळंबा झाला.

बोरगाव काळे येथे एका मराठा आंदोलकाने जरांगे यांच्या समर्थनार्थ उपोषण सुरू केलं असून, त्याचा आज चौथा दिवस आहे. त्यामुळे एका बाजूला मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरी देण्याची सरकारी प्रक्रिया सुरू झाली असताना, दुसऱ्या बाजूला कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आंदोलनाची तीव्रता कायम असल्याचं चित्र आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!