सुनेत्रा पवारांच्या हस्ते गुणवंतांवर कौतुकाची थाप! पुणे ZPच्या १७ शाळा अन् ५२२ विद्यार्थ्यांचा मोठा सन्मान

पुणे : एखाद्या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेतून एखादा विद्यार्थी गुणवत्तेच्या यादीत झळकतो, तेव्हा त्यामागे असते शिक्षकांची मेहनत आणि शाळेची जिद्द! याच मेहनतीला सलाम करत पुणे जिल्हा परिषदेने शिक्षक दिनाचा सोहळा खास बनवला. तब्बल १७ शाळा, ५३ शिक्षक आणि ५२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंचावर झालेल्या या कार्यक्रमात २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठीचे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक, जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, बापूसाहेब पठारे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षकांना सुनेत्रा पवारांचा खास संदेश


शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील धडे शिकवू नयेत, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण करावी, असा संदेश सुनेत्रा पवार यांनी दिला. मुलांमध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे आवाहन त्यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या भूमीत शिक्षणाची ज्योत पेटवली, त्यामुळे या परंपरेला पुढे नेण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळांना मिळणार ४३६ नवे शिक्षक
दरम्यान, शिक्षकांच्या रिक्त पदांबाबतही मोठी माहिती समोर आली. सरकारने रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे ४३६ नवीन शिक्षक जिल्हा परिषद शाळांमध्ये रुजू होणार असल्याचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले. शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी करण्याबाबतही लवकर निर्णय होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बिबट्या प्रवण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंती उभारण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे-पाटील यांनी केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्ह्यातील शाळांच्या कामगिरीची माहिती देताना राज्य गुणवत्ता यादीतील ५० टक्के विद्यार्थी पुणे जिल्हा परिषदेचे असल्याचे सांगितले. मिशन ३००, शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण, ग्लोबल गुरुजी, बालकुमार साहित्य संमेलन, मुलींसाठी सायकल बँक आणि बालसंसद यांसारख्या उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला.
अध्यक्ष चषकात कोण आघाडीवर?
२०२५-२६ मध्ये इयत्ता १ ते ५ गटात गंगावळण (इंदापूर) आणि शिनोली (आंबेगाव) विभागून प्रथम, आमराळवाडी (खेड) द्वितीय आणि अष्टापूर (हवेली) तृतीय ठरली. इयत्ता १ ते ८ गटात पिंपळे खालसा (शिरूर) प्रथम, घाटघर (जुन्नर) द्वितीय, तर काठापूर बुद्रुक (आंबेगाव) आणि पानशेत (वेल्हे) विभागून तृतीय आले.
२०२४-२५ मध्ये इयत्ता १ ते ५ गटात आर्वी (जुन्नर) प्रथम, भांडगाव (दौंड) व पाचर्णेवाडी (शिरूर) विभागून द्वितीय, तर गौराईमळा (इंदापूर) व वाफगाव (खेड) विभागून तृतीय ठरले. इयत्ता १ ते ८ मध्ये वसेवाडी (शिरूर) प्रथम, नाणेकरवाडी (खेड) द्वितीय आणि मांजरवाडी (जुन्नर) व रुळे (वेल्हे) तृतीय ठरले.
१३ तालुक्यांतील शिक्षकांना पुरस्कार
२०२४-२५ मध्ये प्रथम पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये आंबेगावचे विजय सोपानराव वळसे, बारामतीच्या वनिता सचिन जाधव, भोरचे गणेश अशोक बोरसे, दौंडच्या धनश्री माणिक पासलकर, हवेलीचे कुरेशी सलाउद्दीन शेख, इंदापूरच्या प्रेमिला संभाजी खाडे, जुन्नरचे वैभव वामनराव सदाकाळ, खेडच्या शैला मुकुंद गावडे, मावळचे पोपटराव रामचंद्र चौघुले, मुळशीचे रियाज नसीर शेख, पुरंदरचे मनोजकुमार भालचंद्र सटाले, शिरूरचे गोरख भाऊसाहेब काळे आणि वेल्ह्याच्या शबाना जावेद खान यांचा समावेश आहे. विविध तालुक्यांतील शिक्षकांना उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात आले. निर्मला दिलीप काळे यांना गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्कार मिळाला.
२०२५-२६ मध्ये आंबेगावचे संदीप बबन शिंदे, बारामतीच्या विद्या तानाजी गावडे, भोरचे दत्तात्रेय गोरखनाथ पांगारे, दौंडच्या मेधा मधुकर मेस्त्री, हवेलीच्या सुवर्णा पांडू पवार, इंदापूरच्या उषा जयसिंग भोईटे, जुन्नरचे मिलिंद सुरेश औटी, खेडच्या अनिता शरद परदेशी, मावळच्या संगिता किशोर भोसले, मुळशीच्या शुभांगी दशरथ पिंगळे, पुरंदरच्या शुभांगी भानुदास कुंभारकर, शिरूरच्या मनिषा विश्वास साकोरे आणि वेल्ह्याचे विकास दत्तात्रेय गायकवाड यांनी प्रथम पुरस्कार मिळवला. संबंधित तालुक्यांमध्ये उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात आले.
२०२६च्या केंद्रप्रमुख पुरस्कारात वनिता बाळकृष्ण हांडे (नागवडी, जुन्नर) प्रथम, तर शोभा मानसिंग होळकर (मळद, बारामती) द्वितीय ठरल्या. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या या गौरवामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.