जरांगेंच्या उपोषणातच OBC चा नवा एल्गार! अंतरवालीत दुसरं आंदोलन पेटलं; 2 सप्टेंबरच्या GR वरून संघर्ष तीव्र

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज नववा दिवस आहे. त्यांच्या प्रकृतीची स्थिती खालावल्याने मराठा समाजात अस्वस्थता वाढली असून सरकारकडूनही हालचाली सुरू आहेत. मात्र, याच आंदोलनस्थळी आता ओबीसी समाजानेही स्वतंत्र आंदोलन सुरू केल्याने अंतरवाली सराटीतील वातावरण आणखी तापलं आहे.
अॅड. मंगेश ससाणे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आंदोलकांनी अंतरवालीतील सोनियानगरमध्ये लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसींच्या आरक्षणावर अन्याय होऊ शकतो, असा आरोप करत हे आंदोलन करण्यात येत आहे. एकाच गावात दोन वेगवेगळी उपोषणं सुरू झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

ओबीसी आंदोलकांची प्रमुख मागणी 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची आहे. त्यासोबतच शिंदे समिती आणि जातपडताळणी समितीच्या प्रक्रियेलाही त्यांनी विरोध केला आहे. ओबीसी आरक्षणात इतर समाजाचा समावेश केल्यास आधीपासून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या समाजाच्या हक्कांवर परिणाम होईल, असा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागांवर मराठा समाजातील नेत्यांनी निवडणुका लढवल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. खासदार बारणे यांच्या मुलाने, सुनांनी आणि भावजयांनी ओबीसी जागांवर निवडणूक लढवल्याचा दावा करत, मराठा समाजाला स्वतंत्र ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या आंदोलनात विश्वास नांगरे पाटील यांच्या कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. नांगरे पाटील हे पाटील असून कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेत असल्याचा दावा करत, ‘अशा पद्धतीने ओबीसी जागांवर घुसखोरी होत नाही का?’ असा सवाल आंदोलकांनी केला आहे. हा दावा आंदोलकांचा असून त्याची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.
मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मृत ओबीसी आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्याची मागणीही केली आहे. सरकार जरांगेंच्या माध्यमातून ओबीसींच्या आरक्षणातील हिस्सा काढून देत असल्याचा आरोप ससाणे यांनी केला. तसेच राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आणि उदय सामंत हे जरांगेंच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणत असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, ओबीसी आंदोलक विठ्ठल तळेकर यांनी जातपडताळणीच्या मुद्द्यावर प्रसाद लाड यांनी नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली? असा सवाल उपस्थित केला आहे. ‘अंतरवाली आता उपोषण पंढरी झाली आहे, त्यामुळे आम्हीही याच ठिकाणी आंदोलन करत आहोत,’ अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली आहे.
दुसरीकडे, तीन दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं होतं. मात्र, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप सुरू झाल्यानंतरच पुढचा निर्णय घेऊ, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली होती. त्यामुळे एकीकडे मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा सुरू असताना दुसरीकडे ओबीसींचं प्रतिआंदोलन उभं राहिल्याने अंतरवाली सराटी आता महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू ठरली आहे.