परीक्षेचं टेन्शन, बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, वडिलांच्या डोळ्यादेखत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी..

बारामती : बारामती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलीस स्टेशन हद्दीतील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीने आज पहाटेच्या सुमारास टोकाचं पाऊल उचलले. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली उडी मारून या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी बारामती येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे 5 वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पीडित विद्यार्थिनी बारामती येथील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेत होती.

सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ती अभ्यास व परीक्षेचा ताण घेत होती. अभ्यास होत नसल्याबाबत तसेच परीक्षेचे टेन्शन येत असल्याबाबत ती आई-वडिलांकडे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अभ्यास आणि परीक्षेच्या ताणातून तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पालकांनी दिली.


रात्री ती उशीरपर्यंत अभ्यास करत होती. त्यानंतर टेरेसवर जाऊन येत असल्याचे सांगून ती इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेली. बराच वेळ होऊनही ती खाली न आल्याने तिचे वडील तिला पाहण्यासाठी गेले. त्यावेळी ती टेरेसच्या कड्यावर खाली पाय सोडून बसलेली दिसली. वडिलांनी तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला.
तिने त्यांच्याकडे पाहून अचानक टेरेसवरून खाली उडी मारल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून प्राप्त झाली आहे. याबाबत बारामती शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा सध्या सर्व बाजूंनी तपास आणि सखोल चौकशी सुरु आहे. मात्र या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.