महाराष्ट्र पुन्हा हादरला! चिमुकली बसमध्ये एकटी असल्याची संधी साधली; 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, चालकाला अटक


मुंबई : मुंबईजवळील नवी मुंबईत शाळेच्या बसमध्ये अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय बसचालकाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे नवी मुंबई आणि पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी शाळेने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी भाडेतत्त्वावर बस घेतली होती. आरोपी या बसचा चालक होता. संबंधित चिमुकली दररोज याच बसने शाळेत ये-जा करत होती. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ती शाळेतून घरी जाण्यासाठी बसमध्ये बसली होती.

बसने इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर चिमुकली बसमध्ये एकटीच राहिली. याचवेळी आरोपी चालकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने पोटात दुखत असल्याचे आजीला सांगितले. त्यानंतर तिने बसमधील चालकाने तिच्यासोबत चुकीचे वर्तन केल्याची माहिती दिली. आजीने तातडीने शाळा प्रशासनाला याबाबत कळवले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी चिमुकलीची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर आरोपी चालकाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात शाळा प्रशासनातील संबंधित कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.

आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. शाळेच्या बसमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, बसमध्ये सहाय्यक महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आली होती का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!